परभणी - जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यावेळी रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप रुग्णाचा बळी गेला आहे. तब्बल अर्धा तास ऑक्सिजनची मागणी करुनही त्याचा पुरवठा न करण्यात आल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार रुग्णालयात घडला आहे. विशेष म्हणजे, या तरुणाने मृत्यूपूर्वी केलेल्या आपल्या व्हिडिओमुळेच त्याच्या मृत्यूचे कारण उघड झाले आहे.
जिल्ह्यातील शहापूर येथील रामदास आदोडे (३५) हे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात होते. त्यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी तयार केलेला एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की अर्धा तासापासून ऑक्सिजनची मागणी करुनही रुग्णालय प्रशासन ती पूर्ण करत नव्हते. यासोबतच, रुग्णालयामध्ये पुरेसे डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचारीही नाहीत. यामुळे आपल्याला जर काही झाले, तर त्याला रुग्णालय प्रशासन जबाबदार असेल असे रामदास यांनी आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होत असून, यामुळे खळबळ उडाली आहे.
१२ दिवसांपासून झाले नव्हते डायलिसिस..
या व्हिडिओमध्ये रामदास सांगत आहेत, की ते डायलिसिसचे रुग्ण आहेत. मात्र गेल्या १२ दिवसांपासून रुग्णालय प्रशासनाने त्यांचे डायलिसिसही केले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
रुग्णालय प्रशासन याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारुन नेत आहे. तर, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनीही या प्रकाराची माहिती घेतल्यानंतरच आपण यावर बोलू असे म्हटले आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने जिल्हा शल्यचिकित्सकांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी केली होती. तर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांनी सुद्धा थेट आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करून शल्यचिकित्सक नागरगोजे यांचा यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता हा गंभीर प्रकार घडला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी या संदर्भात नेमकी काय चौकशी करतात आणि त्यातून कोण दोषी आढळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.