परभणी - निवडणूक प्रशासनाने जाणीवपूर्वक ७० ते ८० हजार लोकांना मतपत्रिकांच वाटप केलं नसल्याचा आरोप खासदार संजय जाधव यांनी केला आहे. रात्री बारा वाजता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन प्रशासनाला याबाबत जाब विचारला. यावेळी सुमारे २०० शिवसैनिकांसह आलेल्या खासदारांनी 'हा प्रकार जाणीवपूर्वक केलेला असून तात्काळ मतपत्रिकांच वाटप झालं पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी 'वाटप न झालेल्या मतपत्रिका उद्या बीएलओ मार्फत दिल्या जातील. शिवाय मतदान केंद्रांवर देखील वाटपासाठी ठेवण्यात येतील, अशी माहिती दिली. या प्रकरणावरून बुधवारी रात्री बारा वाजता खासदार जाधव यांनी शेकडो शिवसैनिकांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी धाव घेतली. तेथून जिल्हाधिकारी शिवाशंकर यांनी सर्वांना जिल्हा कचेरीत बोलावून घेतले. या ठिकाणी खासदार जाधव यांनी याबाबत प्रशासनाला जाब विचारून तात्काळ कारवाईची मागणी केली. सुमारे अर्धा तास त्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांना माहिती देताना खासदार संजय जाधव यांनी ' हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा आरोप केला. याच्या मागे कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे, मात्र, सध्या वेळ कमी असल्यामुळे प्रशासनाने तात्काळ मतपत्रिका वाटप कराव्यात, अशी मागणी केली.
आज मतदानाच्या तोंडावर परभणीत हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७० ते ८० हजार लोकांना मतपत्रिका न मिळाल्याने ते मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत बोलताना जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी सर्वच मतपत्रिकांच वाटप होऊ शकत नाहीत असे सांगितले. मात्र, परभणी शहरात ८५ टक्के वाटप झाले असून उर्वरित मतपत्रिकांच गुरुवारी सकाळी लवकरात वाटप करण्यात येईल. शिवाय मतदान केंद्रांवर बीएलओंना थांबवून मतदारांना त्या दिल्या जातील, अशी माहिती दिली. परंतु यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर येण्यास नकार दिला.