परभणी - पालिकेच्या महापौरपदी प्रथमच अनुसूचित जातीच्या माहिला उमेदवाराची निवड होणार आहे. आज मंत्रालयात पार पडलेल्या महापौरपदाच्या सोडतीत संबंधित पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने येत्या 22 नोव्हेंबरपूर्वी नवीन महापौरांची नियुक्ती होणार आहे.
या पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे उमेदवार उपलब्ध असून, त्यांनी सूत्र हालवण्यास सुरुवात केली आहे. अनिता रवींद्र सोनकांबळे या काँग्रेसकडून निवडून आलेल्या एकमेव महिला उमेदवार असून, त्यांचीच या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा २७ महापालिकेसाठी महापौर आरक्षण जाहीर, १६ शहरांमध्ये खुल्या वर्गातील महापौर
65 सदस्यीय महापालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे 30 सदस्य असून, राष्ट्रवादीचे 19, भाजप 7, शिवसेना 5, एमआयएम 1 आणि इतर 3 सदस्य आहेत. काँग्रेसच्या विद्यमान महापौर मीनाताई सुरेश वरपूडकर व उपमहापौर माजू लाला यांचा येत्या 22 नोव्हेंबरला कार्यकाळ संपणार आहे. तत्पूर्वी, मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत राज्यातील सर्वच महापालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण सोडतीद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
दुसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे डॉ.वर्षा संजय खिल्लारे या उमेदवार आहेत. त्यादेखील महापौरपदासाठी प्रयत्नशील आहेत. याव्यतिरिक्त सेना-भाजपकडे उमेदवार असले तरीही, पालिकेतील संख्याबळ पाहता या पक्षांकडून महापौरपदासाठी प्रयत्न होण्याची शक्यता कमी आहे.
हेही वाचा नाशिकच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत बुधवारी; भाजपपुढे सत्ता राखण्याचे आव्हान
सध्या उपमहापौर पदाचा देखील कार्यकाळ संपला असून, या पदावर राष्ट्रवादीची वर्णी लागू शकते. राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते विजय जामकर व आमदार बाबाजानी दुर्रानी यांचे भाचे इम्रान हुसेन हे प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे.
तसेच काँग्रेसचे विद्यमान सभापती सुनील देशमुख प्रयत्नशील आहेत.