परभणी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून देशभरात लाॅकडाऊन लावण्यात आला. अनेक गोष्टींवर बंधने आले. सार्वजनिक वाहतूक सेवाही बंद आहे. त्यामुळे नागरिकांना कामानिमीत्त घराबाहेर पडताना आपल्या गाडीचा वापर करावा लागत आहे. लाॅकडाऊनमुळे आर्थिक तारांबळ उडाली असताना, मागील काही दिवसांपासून पेट्रोल- डिझेलच्या किंमती उच्चांक गाठत आहेत. त्यामुळे याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यातल्या त्यात परभणी जिल्ह्यात पेट्रोल- डिझेलच्या किंमती महाष्ट्रात सर्वाधिक असल्याने येथील नागरिक या दरवाढीने अधिक प्रभावित झाले आहेत.
'कोरोना'च्या महामारीत इंधनाच्या दराचा भडका उडाला आहे. त्यातल्या त्यात परभणीत पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा नेहमीच उच्चांक असतो. मात्र, इंधनाच्या या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. अनेक कुटुंबांची आर्थिक घडी बिघडली आहे. निदान 'लॉकडाऊन' च्या परिस्थितीत तरी शासनाने इंधनासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव शिथिल ठेवायला हवेत, अशी माफक अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
सध्या परभणीत पेट्रोलचा दर 89.15 पैसे तर डिझेलचा 80.09 पैसे असा आहे. बुधवारी तर पेट्रोलचा आतापर्यंतचा सर्वाधिक दर 89. 44 पैसे होता. यात वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रतिलिटर दर काही पैसे कमी अधिक असतात. पण साधारणपणे सर्वच कंपन्यांचे दर हे परभणीत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिकच आहेत. मात्र, या वाढलेल्या दरामुळे वाहनधारक अक्षरशः वैतागले आहेत. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग लॉकडाऊन झाले आहे. भारतात तसेच महाराष्ट्रात देखील लॉकडाऊन असून परभणी जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून ही परिस्थिती कायम आहे. यामुळे नागरिक हैराण असतांना आता पेट्रोल-डिझेलच्या भडकलेल्या किंमतीने त्रासले आहेत.
संपूर्ण देशात सर्वात महागड्या ठरलेल्या परभणी जिल्ह्यातील इंधनाच्या दरामुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. 1 जूनपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात परभणीकरांना मुंबई-दिल्लीसह अन्य महानगराच्या तुलनेत इंधनासाठी जास्तीचे दर मोजावे लागतात.
गेल्या कित्येक वर्षांपासून मागास असणाऱ्या परभणी जिल्ह्यास इंधनासाठी देशात सर्वाधिक दर मोजावे लागत आहेत. त्यामागील प्रमुख कारण वाहतुकीचा मोठा खर्च कारणीभुत ठरला आहे. कारण हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपांना सोलापूर डेपोमधून तर भारत पेट्रोलियमच्या पंपांना मनमाड डेपोतून व एस्सार आणि रिलायन्सच्या पंपांना मुंबई किंवा वर्ध्यातून पेट्रोल-डिझेलचा पुरवठा होतो. त्यामुळे या कंपन्यांना इंधन आणण्याकरिता वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणावर येत असल्याने सहाजिकच इंधनाच्या दरावर त्याचे परिणाम दिसून येतात.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता संकटात असतांना त्यात भरीला भर म्हणून केंद्रसरकारने सर्वसामान्य जनतेवर पेट्रोल-डिझेलची दरवाढ लावून महागाईच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इंधनाच्या किंमती अन्य जिल्ह्याच्या तुलनेत संतुलीत करण्यासाठी विशेष वाहतुक अनुदान, पूर्णा रेल्वे जंक्शन किंवा परभणीत पेट्रोलियम डेम्पो व पेट्रोलसाठा करणारे केंद्र स्थापन करावे, अशी मागणी गेली अनेक दिवस परभणीकरांकडून होत असते. मात्र, त्यावर अद्यापही कुठल्याच शासनाने विचार केला नाही. त्यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांना अधिकचा दर देऊनच इंधनाची खरेदी करावी लागते.
सामान्यांच्या तीव्र प्रतिक्रिया...
दरवाढी संदर्भात सर्वसामान्य नागरिक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतात. विशेषतः ग्रामीण भागातून शहरात दररोज ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांना या वाढत्या इंधनाच्या दराचा अधिक फटका सहन करावा लागतो. शासन काही देत तर नाही, मात्र इंधनाचे दर वाढवून नागरिकांचीच लूट करत असल्याचा आरोप परभणीजवळ असलेल्या असोल्याच्या एका शेतकऱ्यांने केला. तसेच सध्या लॉकडाऊन असून अशा परिस्थितीत तरी शासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती नियंत्रणात ठेवायला हव्यात, अशी माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या प्रमाणेच वाढलेल्या दराचा फटका बसलेल्या ऑटोरिक्षा चालकांनी देखील रोष व्यक्त केला. एकतर सततच्या लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर रहदारी नाही. परिणामी प्रवासी मिळत नाहीत. त्यातच पेट्रोलचे भाव वाढून बसल्याने नुकसान होत असल्याचे ऑटोचालक सांगतात. शिवाय व्यापाऱ्यांनी देखील व्यापार ठप्प असून, इंधनाच्या वाढत्या भावामुळे सरकारचा विरोध केला.