परभणी - काही काळ वगळता सुरुवातीपासून परभणी जिल्हा ग्रीनझोन मध्ये आहे. तरी देखील जिल्हा प्रशासनाने मद्य विक्रीची परवानगी नाकारली होती. त्यामुळे जिल्ह्यातील असंख्य मध्यप्रेमींचा हिरमोड झाला होता. मात्र, आता जिल्हा प्रशासनाने मद्यविक्रीसाठी एक ऑनलाईन लिंक तयार केली आहे. या लिंकवर नोंदणी करणाऱ्यांना विशिष्ट दिवशी त्याच्या प्रभागातील दारू दुकानावर दारू मिळणार आहे.
मद्य नोंदणी आणि खरेदीसाठी जिल्हा प्रशासनाने विविध नियम आणि अटी घातल्या आहेत -
१) ऑनलाईन प्रणालीत मद्य खरेदी करण्यास इच्छुक असणाऱयांनी स्वत:चे नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता द्यावा.
२) परवाना धारकांनी परवान्याची फोटो कॉपी आणि परवाना नसेल तर इतर कोणतेही ओळखपत्र अपलोड करावयाचे आहे.
३) प्रत्येक खरेदी करणार्याने आपले स्वत:चे छायाचित्र अपलोड करावयाचे आहे.
४) प्रत्येक मागणी नोंदवताना आपल्याच भागातील मद्य विक्रेता निवडायचा आहे.
५) मद्य प्रकार आणि युनिटची संख्या नमुद करणे आवश्यक आहे.
६) मद्य खरेदीची नोंदणी केल्यानंतर मद्य विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या स्टॉकनुसार ऑर्डर पूर्ण होईल.
७) मद्य खरेदीसाठी परवाना असणे आवश्यक आहे. परवाना नसेल तर खरेदीपुर्वी मद्य विक्रेत्याकडून एक दिवसीय मद्यसेवन परवाना उप्लब्ध करून घ्यावा.
८) सदर मागणी १७ मेच्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत करता येईल.
९) घरपोच सेवेत केवळ विदेशी मद्यच पुरवण्यात येईल.
दरम्यान, मद्य नोंदणी प्रणालीवर खरेदीची मागणी संकलित झाल्यानंतर अर्जांची छाननी करून परभणी जिल्हातील मद्यविक्रेत्यांच्या नावानुसार वर्गवारी करण्यात येणार आहे. ज्या क्रमाने अर्ज केले आहेत, त्या क्रमाने वेळापत्रक करुन देण्यात येणार आहे. संबंधीत खरेदीदाराने नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर त्याला नेमून दिलेला दिवस कळवण्यात येणार आहे. त्या व्यक्तीला त्याच दिवशी दारूच्या दुकानावर जाऊन हवी ती दारू खरेदी करता येणार आहे.