परभणी - 'लॉकडाऊन' मध्ये लाडक्या चिरंजीवाच्या विवाहाचा शाही स्वागत समारंभ आयोजित करून शेकडो लोकांची गर्दी जमवणाऱ्या गंगाखेडच्या व्यापार्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे या समारंभाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची लागण झालेल्या व गंगाखेडमध्ये अन्य संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यापासून ते त्यांच्या विलगीकरणापर्यंत झालेला सर्व खर्चसुद्धा या व्यापाऱ्याकडून वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना बजावले आहेत.
विशेष म्हणजे या संदर्भात शुक्रवारी परभणीत प्रशासनाच्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाला कारवाई करण्याची बुद्धी सूचली आहे.
दरम्यान, संचारबंदीच्या कार्यकाळात गंगाखेडच्या एका व्यापाऱ्याने आपल्या चिरंजीवाच्या लग्नाचा स्वागत समारंभ 28 जूनला नांदेड रस्त्यावरील महेश जिनिंग येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला. ज्याचा परिणाम 10 व्यक्ती 'कोरोना पॉझिटिव्ह' आढळण्यापर्यंत गेला आहे, तर आज त्याच बाधितांच्या संपर्कात आलेल्या 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे या सोहळ्याला काही अधिकाऱ्यांपासून राजकीय मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे घटनेला सुमारे 12 दिवस लोटले तरी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. स्थानिक प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते. त्यातच काल शुक्रवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी परभणीत झालेल्या आढावा बैठकीत याप्रकरणी स्वतः जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज शनिवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गंगाखेडच्या तहसीलदारांना संबंधित व्यापार्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
"लाखोंचा भुर्दंड बसणार"
एका स्वॅबचा एका व्यक्तीचा खर्च 2 हजार 200 रुपये येतो. त्यानुसार आतापर्यंतच्या सगळ्या रुग्णांचा तपासणी खर्च, विलगीकरणातील व्यक्तींच्या भोजनाचा असा सर्वच खर्च संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्यात यावा, असे आदेश आपण तहसीलदारांना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.
'यापूर्वी पहिल्या बाधितांवर झाला होता गुन्हा दाखल'
महत्त्वाचे म्हणजे गंगाखेडच्या संबंधित व्यापाऱ्याचा स्वतःचा स्वॅब निगेटिव्ह आल्याने आता त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला हरकत नाही. तो जर पॉझिटिव्ह आला असता, तर त्याच्याविरुद्ध तूर्त गुन्हा दाखल करण्यात थोडी अडचण आली असती. पण आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचेही जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्याहून चोरट्या मार्गाने परभणीत आलेल्या हिंगोलीतील एका तरुणाचा स्वॅब पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, तो ठणठणीत बरा होताच जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार तत्काळ गुन्हा दाखल केला. तो गुन्हा कोरोना संदर्भातील पहिला गुन्हा दाखल झाला होता.