परभणी - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोनशेच्याजवळ पोहोचल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगलीकर यांनी परभणी महानगरपालिका हद्दीसह 5 किमी परिसरात संचारबंदी लागू केली आहे. यासोबत जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व पंचायत हद्दीसह 3 किमी परिसरात आज दुपारी 3 वाजल्यापासून रविवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. यादरम्यान केवळ अत्यावश्यक सेवांना सूट असून अन्य कोणीही रस्त्यांवर दिसणार नाही, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
परभणी जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात तब्बल 194 कोरोनाबाधित असून, त्यापैकी 78 रुग्णांवर सद्यस्थितीत उपचार सुरू आहेत.
दरम्यान, यापूर्वी आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने त्यांच्या माध्यमातून शहरात इतरांना संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जिल्ह्यात कडक संचारबंदी राहील, असे यापूर्वीच जाहीर केले होते.
आज सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत जिल्ह्यातील सर्व शहरी भागातील बाजारपेठ खुली ठेवून दुपारी 3 वाजल्यापासून पुढे रविवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे.
या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. ज्यामध्ये विविध शासकीय कार्यालय, सेवाभावी संस्था आणि आरोग्य संदर्भातील सेवांना या संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे.
सर्व शासकीय कार्यालय व त्यांची वाहने, शासकीय व खासगी दवाखाने, वैद्यकीय दुकान, वैद्यकीय कर्मचारी व आपत्तकालीन सेवा, शासकीय निवारागृह व अन्न वाटप करणारे एनजीओ व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाना घेतलेली वाहने व व्यक्ती, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांचे संपादक, प्रतिनिधी, वितरक, पेट्रोलपंप व गॅस वितरक, कर्मचारी व वाहने, खत, कृषी, बि-बियाणे वाहतूक व गोदामे, दुकाने, कामगार, कापूस खरेदी केंद्र, राष्ट्रीय बँका केवळ रास्तभाव दुकानदारांकडून चालनद्वारे रोकड भरणा तसेच ग्रामीण भागातील बँकेसाठी रोकड घेवून जाणारी वाहने व दुध विक्रेत्यांना सकाळी 6 ते 9 या वेळात संचारबंदीच्या काळात मुभा देण्यात आली आहे.