परभणी - शहरात नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे. या योजनेत रहिवाशांना नवीन पाणी पाईपलाईनद्वारे नळजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, यासाठी तब्बल 11 हजार रुपये भरावे लागणार असल्याने परभणीकरांनी संताप व्यक्त केला असून याविरोधात स्वाक्षरी मोहीम छेडली आहे. दरम्यान, हा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा... राष्ट्रगीताने होणार महाविद्यालयीन कामकाजाची सुरुवात, अंमलबजावणीला शिवजंयतीचा मुहूर्त
जवळपास दोनशे कोटी रुपये खर्च करून परभणी शहरात नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. या योजनेसाठी येलदरी धरणावर मोठे जलकुंभ बांधण्यात आले. शहराजवळील टाकळी येथे शुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जवळपास सर्वच भागात पाण्याचे जलकुंभ उभारण्यात आले आहेत. यातील बहुतांश टाक्यांमध्ये पाणीसुद्धा आले असून, तपासणीचे काम पूर्ण झाले आहे.
आता प्रत्यक्ष नागरिकांना नळाची जोडणी देऊन ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची वेळ आली आहे. मात्र, यासंदर्भात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रत्येक नळजोडणीसाठी दोन हजार रुपये अनामत रक्कम आणि खर्चापोटी तब्बल नऊ हजार रुपये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात मात्र महापालिकेचे नळ जोडणीसाठी चार ते पाच हजार रुपये खर्च होणार आहेत. असे असताना एका सेवादार कंपनीची नेमणूक करून महापालिकेने खर्चापोटी 9 हजार रुपये आकारले जात आहे. यामध्ये सेवा देणाऱ्या कंपनीला मोठा मलिदा मिळणार आहे. यामुळे मात्र शहरातील जवळपास 50 हजार कुटुंबियांना नाहक भुर्दंड सहन करावा लागणार आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
परिणामी या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे. या अंतर्गत बुधवारी सायंकाळी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ज्येष्ठ नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली. यावेळी महापालिकेने तात्काळ निर्णय मागे घ्यावा आणि लोकांना माफक दरात नळजोडणी द्यावी अशी मागणी करण्यात आली. अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
हेही वाचा... केजरीवाल यांच्या 'अर्थपूर्ण' कामगिरीचा विजयासाठी 'असा' झाला फायदा