परभणी - लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आलेली मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने तत्काळ घ्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या महानगर शाखेच्या वतीने आज (मंगळवारी) शहरातील शनिमंदिरासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी 'उद्धवा दारं उघडा, मंदिरांचे दारं उघडा', अशा घोषणा देण्यात आल्या.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात व राज्यभरात 25 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनलॉक बाबतीतच्या नियमावली जाहीर केल्या. त्यात काही अटी शर्तींवर देशातील धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. यामुळे अनेक राज्यातील मंदिरे भाविकांसाठी उघडण्यात आली. मात्र, याला महाराष्ट्र अपवाद ठरला आहे. यासाठी वारकरी संघटना, अध्यात्मिक संघटना व भाजपच्या वतीने वारंवार राज्यसरकारकडे मंदिरे उघडण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा - उद्धवा धुंद तुझा दरबार: आळंदीत वारकरी, भाजपाच्यावतीने मंदिरापुढे आंदोलन
सप्टेंबरमध्ये मंदिरे उघडावीत, या करिता भाजपने राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केले. तरीही महाराष्ट्र सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. याउलट राज्यातील हॉटेल्स आणि बार उघडण्यात आले. मात्र, मंदिरे अद्याप बंदच आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारने तातडीने मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा, याकरिता परभणी भाजप महानगरच्या वतीने ठिक-ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. त्यानुसार परभणी शहरातील शनी मंदिर येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण करून या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परभणीचे भाजप महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, मनपा सदस्य सुनिल देशमुख, विस्तारक अॅड.एन.डी. देशमुख, ओबीसी जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोरे, महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया कुलकर्णी तसेच काही भाविकांसह सहभागी कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.