परभणी - जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात आज (गुरुवारी) मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर चारही ठिकाणच्या मतमोजणी केंद्रांवर आज कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर निवडणूक प्रशासनही मोजणीसाठी सज्ज झाले आहे. दरम्यान, दुपारी तीन वाजेपर्यंत बहुतांश मोजणी होऊन चित्र स्पष्ट होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.
परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी या विधानसभांसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. आज मतमोजणी होणार असून परभणी विधानसभेची मतमोजणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात केली जाणार आहे. याठिकाणी पोलिसांचा तीन स्तरांमध्ये कडेकोट बंदोबस्त असणार आहे. परवानगीशिवाय कोणालाही त्याठिकाणी फिरकू दिले जाणार नाही.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कोद्री रोडवरील संत जनाबाई महाविद्यालयात तर पाथरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सोनपेठ रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी औंढा रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी होणार आहे. या सर्व ठिकाणी स्ट्राँग रूम तयार करण्यात आल्या असून त्यामध्ये ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॉट ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील राखीव पोलीस दलाची तुकडी या स्ट्राँग रूमच्या सभोवताली बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. परंतु त्यापूर्वी सकाळी पाच वाजता मतमोजणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रात्यक्षिक होईल. सात वाजता उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. शिवाय या ठिकाणी पोस्टल मतदानाची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास १४ टेबलांवर मतमोजणीची प्रक्रिया होणार असून यासाठी प्रशासन आणि पोलीस सज्ज असल्याचे निवडणूक प्रशासनाने सांगितले.
यावेळी मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक प्रशासनाने विशेष उपक्रम राबवले तसेच पथनाट्याच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात आली. परंतु मतदान वाढवण्यात फारसे यश आले नसल्याचे दिसून आले. तर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणीची मतदानाची आकडेवारी समाधानकारक असल्याचे मत जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी व्यक्त केले.