परभणी - जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या गंभीर रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची आता कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयातच ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी केली जात आहे. त्यासाठी काम सुरू करण्यात आले असून, ज्या जागेवर हा प्लॅन्ट उभा राहणार आहे, त्या ठिकाणचे जुने बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे.
परभणीच्या जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी परभणी तालुक्यातील शहापूरच्या एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती देखील नेमली आहे. त्या समितीचा अहवाल अजूनही प्राप्त झाला नाही. मात्र, असे असले तरी ऑक्सिजनचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी प्रयत्न करून हा ऑक्सिजन प्लॅन्ट उभा करण्यासाठी तरतूद केली आहे.
प्लॅन्टसाठी स्थळ निश्चित करण्यात आले आहे. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, ऑक्सिजनकरीता मोठ्या प्रमाणावर सिलेंडर वापरले जातात. मात्र, कधी कधी सिलेंडरचा पुरवठा कमी प्रमाणात होतो. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. कोरोना विषाणू संसर्गासारख्या आपत्तीच्या काळात ऑक्सिजनचा सुरुळीतपणे व पुरेसा पुरवठा व्हावा, यादृष्टीने विचार विनिमय सुरू होता. विशेषतः कोरोना विरूद्धच्या लढाईत हा प्रकल्प पूर्ण व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी मुगळीकर प्रयत्न करत आहेत.
ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणी संदर्भात जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निवासस्थानाजवळ यासाठी जागा निश्चीत करण्यात आली आहे. या निश्चित केलेल्या जागेत तो ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणीचा निर्णय झाला असून, त्या ठिकाणी असलेले जुने बांधकाम पाडण्यास सोमवारीच सुरुवात करण्यात आली आहे. तसेच हा प्लॅन्ट उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. परवानग्या हाती आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात तो प्लॅन्ट उभारल्या जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा ऑक्सिजन प्लॅन्ट सुरू झाल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही योजना निश्चित परभणीकरांसाठी फायद्याची ठरणार आहे.
दरम्यान, ऑक्सीजन प्लॅन्टसाठी जागा निश्चीत केलेल्या ठिकाणी सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, विभागप्रमुख डॉ.दुर्गादास पांडे यांनी पाहणी केली.