परभणी - करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील धार्मिक स्थळे 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज (मंगळवार) सायंकाळी एका आदेशाद्वारे बजावले आहेत.
धार्मिक स्थळांमधील गर्दीतून संसर्ग पसरण्याची शक्यता
मागील काही दिवसांत राज्यात तसेच जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात पुन्हा करोनासंसर्ग वाढणार नाही, याबाबत खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात करोनासंसर्गात होणारी वाढ पाहता सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने काही बाबतीत निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांमध्ये होणारी गर्दी पाहता धार्मिक स्थळे काही कालावधी करता बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
दैनंदिन विधी पार पाडण्यास पाच व्यक्तींना परवानगी
जिल्ह्यातील सर्वच धार्मिक स्थळे 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. धार्मिक स्थळांमध्ये दैनंदिन विधी पार पाडण्यास पाच व्यक्तींना परवानगी राहील. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त तसेच सर्व नगर परिषदा व नगर पंचायत यांचे मुख्याधिकारी यांच्यावर राहणार आहे.
आदेशाचे पालन न करणारी व्यक्ती, संस्था शिक्षेस पात्र
आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंध कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानून कारवाई करण्यात येईल, असेदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.