परभणी - जिंतूर तालुक्यातील ईटोली येथील सुरेशलाला जयस्वाल या दारूमाफियाला दारुचा व्यवसाय करण्यासाठी मदत करणे आणखी 6 पोलीस कर्मचार्यांना चांगलेच महागात पडले आहे. या सर्वांविरुद्ध पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी कारवाई करत दणका दिला आहे. यामध्ये जिंतूर पोलीस ठाण्याच्या एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या कर्मचार्याला शासकीय सेवेतून थेट बडतर्फ केले, तर अन्य चार कर्मचाऱ्यांना निलंबीत करून एकाची पोलीस मुख्यालयात बदली केली आहे. दरम्यान, यापूर्वी देखील याच प्रकरणात 5 कर्मचाऱ्यांवर अशाच प्रकारची कारवाई झाली असून, ज्यामुळे भ्रष्ट पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.
जिंतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक परमेश्वर काकडे यांना बेकायदेशीर दारू विक्रेत्याकडून आर्थिक देवाणघेवाण करून मदत केल्याच्या आरोपावरून शनिवारी (दि. 18 जुलै) सायंकाळी सेवेतून थेट बडतर्फ करण्यात आले. तर शेख अजगर, नामदेव डुबे, राहुल शेळके, साजीद लाला या चौघा कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच सिध्देश्वर चाटे यांची तडकाफडकी परभणी मुख्यालयात बदली करण्यात आली.
जिंतूर तालुक्यातील ईटोली येथील रहिवासी सुरेशलाला जयस्वाल याचा बेकायदेशीर दारू विक्रीचा मोठा व्यवसाय आहे. टाळेबंदीच्या काळात त्याने जिंतूर पोलीस ठाण्यातील काही कर्मचार्यांच्या सहकार्याने संपूर्ण तालूक्यात बेकायदेशीर दारुची भरमसाठ विक्री केली. जयस्वाल याने एका चारचाकीमधून गावागावात दारू पोहोचवून दारुचा अवैध व्यवसाय केला. मागील महिन्यात जिंतूर-येलदरी रस्त्यारुन जाणारी हीच चारचाकी थांबवून जिंतूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी चौकशी केली असता, त्यामध्ये दारुचा अवैध साठा आढळून आला. त्यावेळी जीपचालकासह एकास अटक करण्यात आली होती. त्यांना पोलिसी खाक्या दाखवत केलेल्या चौकशीत हा माल सुरेशलाला जयस्वाल याचा असल्याची माहिती अटकेतील आरोपींनी दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी तत्काळ सुरेश जयस्वाल यास अटक केली. त्याचा मोबाईलही जप्त केला. त्यास जिंतूर न्यायालयासमोर उभे केेले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस कोठडीत सहाय्यक पोलीस अधीक्षक दत्त यांनी कसून तपास केला. तेव्हा अनेक महिन्यांपासून जयस्वाल याचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली. जिंतूर पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांसह परभणी स्थानिक गुन्हे शाखेचेही काही पोलीस कर्मचारी जयस्वाल यास मदत करत असल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांची आर्थिक देवाणघेवाण सुरू होती, हे तपासात सिद्ध झाले आहे. शिवाय जयस्वाल याच्या मोबाईलमध्ये त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे संभाषण असल्याचाही पुरावा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या हाती लागला. ही सर्व माहिती श्रवण दत्त यांनी पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना सांगून या सर्व पोलीस कर्मचार्यांविरूध्द कारवाईची शिफारस केली. त्यानुसार या 6 कर्मचार्यांवर शनिवारी कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे याच प्रकरणात परभणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे तीन पोलीस कर्मचारी हे गेल्या महिन्यातच निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या या कारवाईमुळे आता जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यात गुन्हेगारांना सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे चांगलेच धावपळ सुरू झाली आहे.