परभणी - 'तिच्या जिद्दीपुढे विश्वही ठेंगणे', असे परभणीच्या या ५७ वर्षीय उद्योजक महिलेबद्दल म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. गेल्या 16 वर्षांपासून शहरातील गंगाखेड रोडवर ताडेश्वर सर्विसिंग तथा वॉशिंग सेंटर चालवणाऱ्या मालती गिरी यांची ही कहाणी. मोटार गाड्या दुरुस्त करणे, ग्रीसिंग करणे आणि वॉशिंग (धुणे), हा पुरुषी समजला जाणारा उद्योग आहे. विशेष म्हणजे या उद्योगाच्या जोरावर त्यांनी आपल्या चारही मुलांना शिकवून मोठे डॉक्टर बनवले. शिवाय आपल्या कुटुंबाला आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या देखील सावरण्यास मोठा हातभार लावला आहे.
एक नाहीतर अनेक व्यवसाय करून कुटुंबाचे पोट भरले -
मालती गिरी या फक्त चौथी पास आहेत. त्यांचे माहेर परभणीतील बाभुलगाव आहे. 1977 साली ताडपांगरी येथील तुकाराम गिरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सासरची परिस्थिती बेताची होती. त्यामध्येच लग्नाच्या वेळी तुकाराम गिरी यांना नोकरी नव्हती. कामाच्या शोधात 9180 साली या दाम्पत्याने गाव सोडले. परभणीत आल्यावर त्यांनी टेलरिंगचे काम केले. पत्नीने मदत केली, तर चार पैसे अधिक मिळतील म्हणून त्यांनी मालतीबाई यांना देखील शिलाई मशीन घेऊन दिली. परिस्थिती जाणून मालतीबाई यांनी पुढे दूधविक्री, शिवणकाम, आटाचक्की, मिरची कांडप, साडी विक्री असे विविध उद्योग केले. घर चालू लागले आणि 1981 झाली तुकाराम यांना वीज कंपनीत नोकरी मिळाली. ते काही दिवसातच चालक पदावर सेवेत कायम झाले. मात्र, बदलीमुळे तुकाराम बाहेरगावी जाऊ लागले आणि कुटुंबाची जबाबदारी मालतीबाईंनीवर येऊन पडली.
गॅरेजचालक म्हणून प्रवासाची सुरुवात -
दरम्यान, आपण शिकलो नाही, ही खंत मलतीबाईंच्या मनात होती. त्यामुळे मुला-बाळांना शिकवून मोठे करायचे, ही जिद्द त्यांनी कायम मनाशी बाळगली होती. आता त्यांचा दिवस पहाटे ४ वाजता सुरू व्हायचा आणि रात्र अकरा वाजता संपायची. अर्थात या जोडप्याच्या कष्टाचे चीज झाले. चारही मुले शिकून डॉक्टर बनली. मधल्या काळात त्या पतीकडून ट्रॅक्टर चालवायला शिकल्या आणि येथूनच मालती गिरी यांचा गॅरेजचालक म्हणून प्रवास सुरू झाला. लहानपणापासूनच मशिनरी हाताळणे, दुरुस्ती याबद्दलचे त्यांचे कुतूहल त्यांना येथे कामी आले. चालक म्हणून सेवेत असताना तुकाराम यांनाही वाहन दुरुस्ती बद्दल माहिती होती. आपल्यालाही वाहन दुरुस्त करता आले पाहिजे, असा अट्टाहास मालती गिरी यांचा होता. त्यांची आवड पाहून तुकाराम गिरी यांनी त्यांना वाहन दुरुस्तीचे धडे दिले आणि त्यानंतर 2004 साली त्यांचा हा उद्योग उभा राहिला, तो आजपर्यंत अत्यंत यशस्वीपणे सुरू आहे.
'तुम्हाला नवरा नाही का? नवरा नसलेल्या बायका नाईलाज म्हणून असे कुठलेही काम करतात.'
सुरुवातीला माझ्या पतींना केवळ दोनशे रुपये पगार होता. त्यामधून कुटुंब कसे चालवायचे? हा प्रश्न आमच्यापुढे होता. त्यामुळे आम्ही मिरची कांडप, दूधविक्री, शिवणकाम विविध उद्योग केले. मात्र, मुले मोठी होऊ लागली. त्यांच्या शिक्षणासाठी पैसा लागू लागला. येथे आल्यावर काय काम करायचे, असा प्रश्न माझ्यापुढे होता. मुलांना शिकायला बाहेर ठेवले होते. पैसा हवा होता. पती देखील बाहेर गावी कामाला जायचे. त्यामुळे राहत्या घरात सर्व्हिसिंग सेंटर सुरू करायचे ठरवले. मला त्या कामाची माहिती होती. तसेच काही कारणामुळे शिलाई मशीन चालवायची नव्हती. त्यामुळे सर्व्हिसिंग सेंटर सुरू केले. सुरुवातीला काही लोकांना विशेष वाटत होते. काहीजण हिणवायचे. एकजण गाडी धुवून झाल्यावर म्हणाला, 'तुम्हाला नवरा नाही का? नवरा नसलेल्या बायका नाईलाज म्हणून असे कुठलेही काम करतात.' त्यावेळी माझे पती घरातच होते. मी त्यांना बोलावून त्यांची ओळख करून दिली आणि सांगितले मला आवड आहे म्हणून मी हे काम करते.
दुकानात अनेक प्रकारचे ग्राहक येतात. कधी एखादा बाई आहे म्हणून समजून घेतो, तर एखादा बाई आहे म्हणून मुद्दामहून वेडेवाकडे बोलतो. दररोज सकाळी ८ वाजता सेंटरचे काम सुरू होते. ट्रॅक्टर, ट्रक, जीप, कार, रिक्षा अशी सर्व प्रकारची मोठी वाहने धुवून ग्रिसिंग करण्याचे काम मी स्वतः करते. आता हाताखाली ३-४ मुलेही कामाला आहेत, असे मालतीबाई सांगतात. विशेष म्हणजे ही सर्व कामे करताना मालतीबाईच्या अंगात टी-शर्ट आणि काळवंडलेली पॅन्ट असते. केस विसकटू नयेत म्हणून डोक्याला टोपी लावलेली असते.
दोन मुले, दोन मुली अन् सुनाही डॉक्टर -
मालतीबाईंची मोठी मुलगी पूजा नॅचरोपॅथी आणि डीएमएलटी पदवीधारक आहे. दुसरी बेबी ही एमबीबीएस-एमडी असून सध्या वैद्यकीय अधिकारी म्हणून सेलू येथे कार्यरत आहे. तिसरा मुलगा कैलास हा देखील एमबीबीएस-एमडी आहे, तर चौथा दत्तात्रेय सुद्धा एमबीबीएस (डेंटिस्ट) आहे. चारही मुलांना मालतीबाईंनी डॉक्टर बनविण्याचा संकल्प पूर्ण केला. विशेष म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलींना डॉक्टर पती मिळाले असून, दोन्ही सुना देखील डॉक्टर आहेत. शेवटी त्या म्हणतात, आज माझी चारही मुले डॉक्टर झाली, यातच मला समाधान आहे. महिला म्हणून व्यवसायात काही अडचणी आल्या, त्या दूर करायला मी अनुभवातून शिकत गेले.
दरम्यान त्यांच्याबद्दल त्यांची मुलगी डॉ. बेबी गिरी आणि त्यांची लहान सून आकांक्षा गिरी यांनी आपल्याला आई मालती गिरी यांचा अभिमान असल्याचे सांगितले.