परभणी - यावर्षी परभणी जिल्ह्यात तापमानाने 47 अंशाचा पल्ला गाठला होता. गेल्या काही दिवसांपासून 42-43 अंशावर परभणीचे तापमान स्थिरावले आहे. परंतू सतत तापलेल्या उन्हामुळे वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण झालेली आहे. परिणामी, नागरिकांना उष्माघाताचा सामना करावा लागत आहे. यात गेल्या महिन्यात सोनपेठ आणि गंगाखेडमध्ये दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर काल जिंतूर तालुक्यात एका वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने आत्तापर्यंत उष्माघाताने दगवणाऱ्यांची संख्या तीन झाली आहे.
बापूराव राघोजी मोरे (वय 70 वर्षे) असे या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. ते जिंतुर तालुक्यातील चारठाणा या गावापासून 13 किमी अंतरावर असलेल्या मौजे सायखेडा (बा) येथील रहिवासी आहेत. 9 मे रोजी ते भरउन्हात आपल्या शेतात काम करत होते. वरून सूर्य आग ओकत होता. खालून जमीन तापली होती. उन्हाचे चटके सहन होत नव्हते. अशा परिस्थितीत काम केल्याने त्यांना उष्माघाताचा त्रास झाला. रात्री अचानक ताप, उलटी, जुलाब सुरु झाल्याने सकाळी त्यांना जालना दवाखान्यात उपचारसाठी दाखल करण्यात आले. 24 तास त्यांच्यावर उपचार करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान बापुराव मोरे यांचा शनिवारी मृत्यू झाला. उदरनिर्वाहासाठी त्यांची मुले मुंबई येथे मोलमजुरी करतात. गरीब परिस्थिती असल्याने ते गुरा-ढोरासह शेतातच राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व नातवंडे असा परिवार आहे.