मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात कोरोनाने आता रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस राज्याच्या चिंतेत आणखी वाढ करत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 हजार 574वर जाऊन पोहचला आहे. अशा वेळी एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.
राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला असताना काही जिल्हे मात्र कोरोनामुक्त आहेत. महाराष्ट्रात असे 8 जिल्हे आहेत जेथे, आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. दरम्यान, खबरदारी म्हणून या राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच या जिल्हयाच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. याचसोबत कोरोनाचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यासाठी खास कोरोना कक्ष तयार ठेवले आहेत.
- या जिल्ह्यात नाही कोरोनाचा एकही रुग्ण -
- परभणी
परभणी जिल्ह्यात सुरुवातीपासून अद्यापपर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेला नाही. परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 287 रुग्ण संभाव्य म्हणून जिल्हा तसेच स्थानिक पातळीवरील काही रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी 145 रुग्णांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे. तर सद्यपरिस्थितीत संसर्गजन्य कक्षात 28 रुग्ण दाखल आहेत. याशिवाय 114 रुग्ण आपल्या घरी विलगीकरण करून त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. यामध्ये परदेशातून आलेले 62 रुग्ण असून त्यांच्या संपर्कात आलेले 6 रुग्ण होते.
तर गेल्या 24 तासात 18 नवीन संभाव्य रुग्ण नोंद झाले असून त्या सर्वांचा सर्वांच्या स्वॅबचे नमुने औरंगाबाद शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 20 जणांचे अहवाल अजूनही प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
- सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रूग्ण नसल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. सोलापूरमध्ये आत्तापर्यंत 212 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून सर्वांचे अहवाल हे निगेटीव्ह आलेले आहेत. त्यामुळे सध्या सोलापुरात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
- गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील 40 कोरोना संशयित रुग्णांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्व 40 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
- चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नसला नाही. मात्र, प्रशासनाने खबरदारी घेत कोरोना कक्ष तयार केला आहे. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्याची संख्या ही 26 हजार 663 एवढी आहे. त्यापैकी 22 हजार 181 जणांनी आपल्या 14 दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. तर 4 हजार 482 जण सध्या चंद्रपुरात निगराणीखाली आहेत.
- नांदेड
नांदेड जिल्ह्यात सध्या एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण रुग्ण आढळून आला नाही. आत्तापर्यंत 482 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून 100 जणांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच 49 जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तर घरीच क्वारंटाईन केलेल्या रुग्णांची संख्या 426 आहे. जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 70 हजार 624 असून त्यांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याबरोबरच त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले आहेत.
- नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. तर आतापर्यंत 66 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यापैकी 58 लोकांचा अहवाल प्राप्त झाला झाला आहे. तर 8 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तसेच जिल्ह्यातील 43 लोकांना आयसोलेनशन वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. तर 7 लोकांना होम क्वारंटाईन करुन 7 लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
- गोंदिया
गोंदिया जिल्ह्यात सध्या एकही कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण नाही. जिल्ह्यातील एकूण 122 नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी 112 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात 1 युवक 26 मार्चला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 10 नमुन्यांचा अहवाल आणखी प्रतिक्षेत आहेत.
जिल्ह्यातील 2 शासकीय अलगीकरण केंद्रात 59 व्यक्ती उपचार घेत आहेत. यामध्ये गोंदिया आयुर्वेदिक कॉलेज 49 आणि लहीटोला 10 अशा एकूण 59 व्यक्तींचा समावेश आहे.
- वर्धा
वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात परदेशातून आलेल्या 114 प्रवाश्यांना विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 67 जणांचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले असून 66 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर यातील एकाचा अहवाल येणे बाकी आहे. तसेच पुणे, मुंबईसह इतर शहरातून आलेल्या 15 हजार 262 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापैकी 12 हजार 605 जनांचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे. यापैकी 2 हजार 657 जणांचे कालावधी अद्याप पूर्ण होणे बाकी आहे.