परभणी - जिल्ह्यात सध्या एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही. मात्र, संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच मंगळवारी (दि. 24 मार्च) एकाच दिवशी 39 नवीन संशयितांची तपासणी करण्यात आल्याने परभणी जिल्ह्यात कोरोनासंदर्भात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आतापर्यंत संशयित म्हणून 251 जणांची तपासणी झाल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे.
कोरोनासंदर्भात बुधवारी सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयात 113 रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, त्यापैकी 65 जणांचे स्वॅब घेण्यात आले. परंतू त्यातील 34 नेगीटिव्ह असून 16 स्वॅबचा अहवाल प्रलंबित आहे. तर आजतागायत एकूण 15 स्वॅब एनआयव्ही (राष्ट्रीय विषाणु संस्था) पुणे यांनी तपासणीची आवश्यकता नसल्याचा कळविले आहे.
दरम्यान, तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये 51 परदेशातून आलेले व त्यांच्या सहवासातील तर देशातंर्गतचे 3 असे एकूण 54 नागरिक साध्य आरोग्य विभागाच्या निगराणीखाली आहेत. यातील 15 जण जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहेत. तर उर्वरित 98 नागरिक त्यांच्या घरी विलगीकरण (होम क्वारंटाईन) करण्यात आले आहेत. त्यांच्या निवासस्थानी वैद्यकीय पथकामार्फत फेर तपासणी करण्यात येत असून या 98 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. चिंतेची बाब म्हणजे एकाच दिवशी नविन 39 संशयित नागरिकांची जिल्हा रुग्णालय व अधिनस्थ आरोग्य संस्थेत नोंद झाली. आतापर्यंत कोव्हीड-19 बाह्य रुग्ण विभागात 251 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, नवीन आलेल्या रुग्णांपैकी 8 रुग्णांचा नमुना (स्वॅब) तपासणीसाठी एनआयव्ही (राष्ट्रीय विषाणु संस्था) पुणे येथे पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यामध्ये क्वारंटाईनसाठी 320 खाटा व आयसोलेशनसाठी शासकीय आणि खासगी असे एकूण 225 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच परभणी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्व उपजिल्हा रुग्णालये व ग्रामिण रुग्णालये येथे कोव्हिड-१९ बाबतची तपासणी व आयसोलेशन वार्ड उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे संशयित लोकांनी जिल्हा रुग्णालयापर्यंत न येता जवळच्या रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, आज जिल्हाधिकाऱ्यांनी इंडियन मेडिकल आसोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात असोसिएशनने आपत्तीबाबत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनास दिले. तर आजच विभागीय आयुक्त सुनिल केंद्रकर यांनी देखील परभणी जिल्ह्यातील कोरोना आपत्ती बाबत आढावा घेतला.
युनियन बँकेतील संशयित कर्मचाऱ्यांचा नमुना निगेटिव्हच
जिल्ह्यातील प्रत्येकाचे लक्ष लागलेल्या युनियन बँकेतील संशयित कर्मचाऱ्यांचा नमुना राष्ट्रीय विषाणु संस्था, पुणे येथे तपासण्यात आला. मात्र, या नमुन्यात कोरोनाचे कुठलेही अंश सापडले नसल्याच्या निर्वळा संस्थेने दिला आहे. त्यामुळे जनतेने युनियन बँके संदर्भात पसरणाऱ्या कुढल्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवु नये, असे आवाहन करतानाच मंगळवारी संध्याकाळपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधीत एकही रुग्ण नसल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.
हेही वाचा - कोरोना : परभणीत मनपाकडून कार्यालय आणि रस्त्यांवर निर्जंतुकीकरण फवारणी