परभणी - विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या छायाचित्राला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. वसमत रोडवरील राष्ट्रवादी भवन पुढे हे आंदोलन करण्यात आले असून यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत दरेकरांच्या निषेध केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संपूर्ण राज्यात विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. विशेषता महिला पदाधिकारी यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत असून, या अंतर्गत बुधवारी (दि. 15 सप्टेंबर) परभणीतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसमत रोडवरील कार्यालयापुढे हे आंदोलन पार पडले.
महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र भावना
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या प्रवेश करणार आहेत. यावर प्रवीण दरेकर यांनी नाव न घेता टीका केली होती. याच मुद्द्यावर बुधवारी प्रवीण दरेकर यांचा परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी निषेध व्यक्त केला. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पोस्टरला जोडे मारून त्या पोस्टरचे दहनही केले. तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रवीण दरेकर यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी 'प्रवीण दरेकर यांना दिसेल तिथे आम्ही धडा शिकवू, असा इशारा परभणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा भावना नखाते यांनी दिला आहे. तसेच महिला आघाडीच्या शहराध्यक्ष नंदा राठोड यांनीही प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.
पोलिसांकडून आंदोलनकर्त्या महिलांना रोखण्याचा प्रयत्न
दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण, महिलांनी दरेकर यांच्या पोस्टला जोडे मारून त्या पोस्टरचे दहन केले. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा - परभणीत बापलेकीचा विहिरीत बुडून मृत्यू, महालक्ष्मी पूजनाच्या दिवशीच घडली घटना