परभणी - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा परभणी-हिंगोली-नांदेड जिल्ह्यातील आगामी दौरा चांगलाच वादात सापडला आहे. या संदर्भात मुंबईत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपालांच्या या दौऱ्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आढावा घेण्याच्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. तर आता परभणीतील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के यांनी राज्यपालांना या दौऱ्यात काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
'समांतर यंत्रणा भासवण्याचा प्रयत्न आहे का?'
'महाराष्ट्रात दोन समांतर यंत्रणा कार्यरत असल्याचे भासवण्याचा हा राज्यपालांचा प्रयत्न आहे का? असा सवाल देखील परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत उपस्थित केला आहे. त्यामुळे राज्यपालांच्या परभणीसह तीन जिल्ह्यांतील या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद आणि संघर्ष काही केल्या संपत नाही. उलट तो वाढत आहे. विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्त्या असो की मग राज्यातील इतर प्रश्न, कोश्यारी यांनी नेहमीच राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. आता तर उद्धाटनाच्या कार्यक्रमाला जातांनाच तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका देखील ते घेणार आहेत.
कोश्यारी यांचा 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान दौरा-
राज्यपाल कोश्यारी हे 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान, मराठवाड्यातील नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात येत आहेत. या दौऱ्यात त्यांनी तीनही ठिकाणी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित केल्या असून ते त्यांच्याकडून आढावा घेणार आहेत.
'...तर काळे झेंडे दाखवू'
'राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. राज्यातील कुठल्याही विषयाची माहिती त्यांना राज्याचे सचिव, मुख्यमंत्री यांच्याकडून मिळू शकते. असे असतांना थेट जिल्ह्यात जाऊन आढावा बैठक घेणे, हे चुकीचे असून यामुळे राज्यात दोन संमातर यंत्रणा काम करत असल्याचे चित्र निर्माण होऊ शकते, असा आरोप परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के यांनी केला आहे. तसेच त्यांनी परभणीत प्रोटोकाॅल मोडून राजकीय पक्षांप्रमाणे बैठका घेऊ नये, अन्यथा काळे झेंडे दाखवू, असा इशारा देखील दिला आहे. तसेच या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन देखील पाठवले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा-राज्यपालांचा मराठवाडा दौरा; सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्षाची ठिणगी!