परभणी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या एका वक्तव्याचा महाराष्ट्रात विविध स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. आज (मंगळवारी) परभणीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांच्यासह सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. हाताला काळ्या फिती लावून हे आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी यांचा संदर्भ देणारे एक वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात केले होते. परंतु प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामी यांची कधी भेट झाली नाही, असे सांगत आज परभणीत सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध नोंदविण्यात आला. कार्यकर्त्यांनी 'राज्यपाल हटाव देश बचाव' अशी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
'शिवरायांचे महत्त्व कमी करण्याचा राज्यपालांचा अजेंडा'
इतिहासात हस्तक्षेप करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेले वक्तव्य बेताल नसून ते जाणीवपूर्वक आहे. छत्रपती शिवराय आणि माँ जिजाऊचे महत्व कमी करण्याचा अजेंडा राज्यपालांकडून राबविण्यात येत असल्याचा आरोप खासदार फौजिया खान यांनी यावेळी केला. त्यामुळे अशा राज्यपालांची तत्काळ बदली करावी, अन्यथा यापुढे देखील राज्यपालांविरोधात निदर्शने सुरूच राहतील, असा इशारा देखील खासदार फौजिया खान यांनी यावेळी दिला.
हेही वाचा - Governor Controversial Statement : सोलापुरात राज्यपालांच्या 'त्या' विधानाचे शिवसेनेकडून निषेध