परभणी - येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते राजेश विटेकर यांनी त्यांच्यावर सोनपेठ येथील एका शिक्षिकेने केलेला बलात्काराचा आरोप फेटाळून लावला आहे. यासंदर्भात आपण वकिलांचा सल्ला घेऊन पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सदर शिक्षिका राजेश विटेकर सचिव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थे अंतर्गत चालणाऱ्या रामकृष्ण बापू विद्यालयात कार्यरत आहे.
परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेसचेनेते तथा जि.प.चे माजी अध्यक्ष व लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप सोनपेठ येथील या पिडीत शिक्षिकेने केला आहे. राजेश विटेकर यांनी नोकरीचे आणि लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केला, असा आरोप या शिक्षिकेने केला असून, या संदर्भात आज (गुरुवारी) भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या मदतीने पुण्यात पत्रकार परिषद घेत आपली कैफियत मांडली.
अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा आरोप -
राजेश विटेकर यांनी आपले अश्लील व्हिडिओ तयार केले असल्याचा आरोप देखील पीडितेने केला आहे. गेल्या वर्षभरापासून आपल्यावर अत्याचार करण्यात आला. तक्रार करुनही अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. आपल्याकडे सर्व पुरावे आहेत, पण फक्त तपास सुरू असल्याचे सांगितले जाते. गृहमंत्री आपल्या पक्षाचे आहे, आपण शरद पवार यांच्या निकटवर्तीय आहोत, त्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होणार नाही, कोणी काही वाकडं करणार नाही, असे राजेश विटेकर म्हणत असल्याचा दावा पीडितेने केला आहे. त्यामुळे राजेश विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, यामध्ये त्यांच्या आईही सहभागी आहेत, असे पीडितचे म्हणणे आहे.
अन्यथा परभणीत येऊन आंदोलन करू -
आपल्या जीविताला धोका असून आपली आई आणि बहीण यांना देखील खोट्या प्रकरणात अटक केली होती, असा आरोप पीडितेने केला आहे. त्यामुळे या पीडितेला सरकारने न्याय द्यावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. जर संबंधितांना तातडीने अटक झाली नाही, तर परभणीत येऊन आंदोलन करू, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिलेला आहे.
तुर्तास प्रतिक्रिया देण्यास नकार -
दरम्यान, या गंभीर आरोपासंदर्भात राजेश विटेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तुर्तास प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. 'आपण सध्या मुंबईत आहोत. आपल्या वकिलांशी चर्चा करून उद्या पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका स्पष्ट करून सविस्तर बोलेल, असे त्यांनी सांगितले आहे.
कोण आहेत राजेश विटेकर -
राजेश विटेकर यांची राष्ट्रवादी कॉग्रेसचे परभणी जिल्ह्यातील तरुण नेते म्हणून ओळख आहे. त्यांचे वडिल माजी आमदार कै. उत्तमराव विटेकर हे शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये सिंगनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्या आई निर्मला विटेकर जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा आहेत. तर राजेश यांनी विटा ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पदापासून राजकारणाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी सोनपेठ बाजार समितीचे सभापती आणि परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून काम केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजणी दुर्राणी व खासदार फौजिया खान यांचे ते विश्वासू आहेत.
तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी देखील त्यांचे चांगले संबंध आहेत. शिवाय जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी सेनेचे खासदार संजय जाधव यांना चांगली लढत दिली. मात्र, त्यांचा 42 हजार मतांनी पराभव झाला.
हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा शिक्षिकेचा आरोप