परभणी - संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून हजारो तरुणांना कोट्यावधी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. मात्र, परभणी जिल्ह्याच्या कामगिरीवर मी असमाधानी आहे. यामध्ये जास्तीत जास्त अडमुठ्या बँक अधिकार्यांचा दोष असल्याचे झालेल्या बैठकीत समोर आले आहे. त्यामुळे येणार्या काळात अशा अडमुठ्या अधिकारी व कर्मचार्यांना कायदेशीर तसेच प्रेमाने सरळ करू, असा इशारा मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजप सरकारच्या कार्यकाळात मराठा समाजातील होतकरू तरुणांना उद्योगधंद्यासाठी कर्ज मिळवून देण्याचे काम करण्यात येत आहे. याचाच आढावा घेण्यासाठी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सकाळी गंगाखेड येथे आढावा घेतला. मात्र, त्याठिकाणी तरुणांची प्रचंड नाराजी दिसली. योजना चांगली असूनही बँकांच्या अडमुठ्या धोरणांमुळे कर्ज वाटप हवे तसे होऊ शकले नाही, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात देखील बैठक घेण्यात आली. यामध्ये जिल्हाधिकारी, अधिकारी सर्वांनी मिळून जास्तीत जास्त कर्ज वाटप या विषयी चर्चा केली. बँकेच्या अधिकार्यांना सुचना देण्यात आल्या. प्रत्येक बँकेच्या शाखेत योजनेची माहिती सांगण्यात यावी. अर्ज किती आले व किती अर्जदारांना कर्ज दिले याची नोंद देखील बँकेत असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात तब्बल 6 हजार तरुणांना 400 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. पण परभणीमध्ये 125 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यांना 1 कोटी 51 लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. राज्याच्या मानाने परभणी जिल्ह्यात कमी प्रमाणात कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे आता स्वतः परभणी जिल्ह्यामध्ये लक्ष देणार असल्याचे पाटील म्हणाले.
परभणीतील मराठा समाजातील युवकांना जास्तीत जास्त उद्योजक करण्याचा प्रयत्न करणार आहे. बँकांच्या प्रत्येक शाखांना जिल्हाधिकार्यांमार्फत लवकरच आदेश देण्यात येणार आहेत. त्यानुसार बँकांनी कारवाई करायची आहे. चालू वर्षामध्ये परभणी जिल्ह्यात 2 हजार प्रकरणे पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. ते पूर्ण करून त्यापेक्षा जास्त युवकांना कर्ज मिळवून देण्यासाठी महामंडळाच्यावतीने प्रयत्न करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.