परभणी - जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये मोलमजुरी करणारे तसेच विविध व्यवसायानिमित्त मध्य प्रदेशातून आलेले ४२४ कामगार लॉकडाऊनमुळे अडकले होते. सोमवारी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळाच्या १८ बसमधून त्यांना रवाना करण्यात आले. परभणी, पूर्णा, पाथरी, मानवत आदी ठिकाणच्या बस स्थानकातून या कामगारांना धुळे जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर पाठवण्यात आले आहे.
परभणी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, आदी राज्यातील कामगार आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे त्यांचा व्यवसाय बंद आहे. शिवाय विविध कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे, या सर्वांना आपल्या घराची ओढ लागली होती. अनेकजण गावी जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या चकरा मारत होते. या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची गेल्या काही दिवसांपासून नोंदणी करण्यात येत होती. यात नोंद झालेले ४२४ कामगार मध्य प्रदेशात पाठविण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली.
या कामगारांना परिवहन महामंडळाच्या १८ बसमधून धुळे जिल्ह्याच्या मध्यप्रदेश सीमेपर्यंत मोफत पाठवण्यात येत आहे. सोमवारी दिवसभरात या बस पूर्णा, परभणी, सेलू, मानवत आणि पाथरी या बस स्थानकातून धुळे जिल्ह्याकडे रवाना करण्यात आल्या. प्रत्येक बसमध्ये दोन चालक देण्यात आले असून 22 प्रवाशांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तत्पूर्वी, सर्व बसचे निर्जंतुकीकरण करण्यात आल्याची माहिती परभणी आगारप्रमुख दयानंद पाटील यांनी दिली.
परभणी व पूर्णा बस स्थानकातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या ७ बसमधील प्रवाशांची पाथरी रोडवरील सरदेशपांडे नर्सरी परिसरात जेवणाची व्यवस्था करण्यात आली. वीर सावरकर विचार मंच, म.शं.शिवणकर प्रतिष्ठान यांच्यावतीने जेवणाची पाकिटे तसेच पाण्याच्या बाटल्यांची सोय करण्यात आली. बस घेऊन जाणाऱ्या चालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागतही करण्यात आले.