परभणी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यात रस्त्यावर कोणीही विनाकारण फिरू नये, असे आवाहन वारंवार पोलीस प्रशासनाकडून करण्यात येते. तरी देखील अनेकजण आपली वाहने घेवून रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळून येत असल्याने पोलिसांना नाईलाजास्तव कारवाई करावी लागते. या अंतर्गत आत्तापर्यंत तब्बल १ हजार ७०० हुन अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. मात्र, आता गेल्या दोन दिवसांपासून दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी दिली आहे.
कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी टाळेबंदी करण्यात आली आहे. लॉकडाऊनचा आता तिसरा टप्पा सुरू असून, पोलिसांनी वाहनांसह आवश्यक नसेल तर विनाकारण फिरू नये, असे आवाहन केले आहे. तरी देखील अनेक नागरिकांकडून विनाकारण रस्त्यांवर फेरफटका मारण्याचे प्रकार सुरू आहेत. गरज नसताना अनेक जण रस्त्यावर आपल्या दुचाक्या व चारचाक्या गाड्या घेऊन फिरत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या पथकाकडून संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी फिक्स लाकडाचे बॅरीकेट्स लावून बंदोबस्त ठेवला आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.
या कारवाई अंतर्गत आत्तापर्यंत सतराशेहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी दिली आहे. मात्र, तरीही लोकांमध्ये फरक जाणवत नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात 88 हजार रुपयांचा दंड वाहनचालकांकडून वसूल करण्यात आला आहे, तर वाहतूक शाखेने परभणी शहरात 33 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई सुरूच असून वाहनधारकांची कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. कारवाईमध्ये सर्वाधिक आकडा विनाकारण फिरणाऱ्यांचा आहे. दंडात्मक कारवाईमुळे लोकांवर वचक बसेल आणि ते घरातच राहून कोरोनाचा सामना करतील, अशी अपेक्षा सरोदे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - परभणीतील ८५ परप्रांतीय मजुरांना पोहचवले सीमेपर्यंत; कर्नाटक, तेलंगाणाच्या प्रवाशांना आज करणार रवाना