परभणी - जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. या अवकाळी पावसाने परभणी तालुक्यातील अनेक गावामधील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे आतोनात नुकसान झाले. अवकाळी पावसासह गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी शासनाकडे केली आहे.
परभणी तालुक्यातील टाकळी बोबडे आणि जोडपरळी या भागात आमदार डॉ. राहुल पाटील यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची बुधवारी पाहणी केली. या परिसरातील सुमारे ५०० हेक्टर जमीनीवरील केळी, खरबुज, टरबुज, आंबा, मोसंबी या बागायती पिकासोबत भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या सौरपंपाचे वादळी वाऱ्यातून नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रेही उडाली आहेत. आमदार पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेवून एकंदरीत त्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला. याबाबत कृषि विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करून त्वरित नुकसानभरपाई मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही देखील यावेळी यांनी दिली. याप्रसंगी त्यांच्यासमेवत जि.प. सदस्य दिनेश बोबडे, संतोष बोबडे, विलासराव बोबडे, इंद्रजीत काळे, बापु वैद्य, प्रसाद काळे, कैलास बोबडे, ज्ञानेश्वर बोबडे, महेश इंगळे, बाळराजे तळेकर आदी उपस्थित होते.