परभणी - शहरातील मूलभूत सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी नगर विकास मंत्रालयाने 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचे पत्र प्राप्त झाले असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली. शहरातील प्रभाग 4 आणि 10 मधील पुलाची निर्मिती, डांबरीकरणाचे रस्ते आणि सिमेंट काँक्रीटच्या नाला बांधकामासाठी हा निधी मिळाला आहे.
परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील जिंतूर रोड लगतच्या रायगड कॉर्नर ते सय्यद शाह तुरतपीर दर्गा इथंपर्यंत डांबरीकरण रस्ता व दुतर्फा नाली बांधकामासाठी 4 कोटी रुपये, तसेच प्रभाग क्रमांक 10 मधील अंतर्गत रस्ते व नाली बांधकामासाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
विशेष म्हणजे रायगड कॉर्नर ते दर्गा येथील रस्त्याच्या निर्मितीसाठी या भागातील नागरिकांनी अनेकदा निवेदने देऊन आंदोलने केली होती. त्याचप्रमाणे परभणी शहरातील आशीर्वाद नगरच्या दुर्गादेवी मंदिराच्या कॕनाल वरील पुलाच्या बांधकामासाठी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा पूल जायकवाडी कार्यक्षेत्रात येत असल्याने पाटबंधारे विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये असंतोष होता. याबाबत आमदार डॉ.राहुल पाटील यांच्याकडे भागातील नागरिकांनी पुलाच्या निर्मितीची मागणी केली होती.
आमदार पाटील यांनी पाटबंधारे विभागाची संपर्क साधून वरिष्ठ पातळीवरून हे ना हरकत प्रमाणपत्र मिळवल्याने पुलाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याअनुषंगाने आता सदर पुलाच्या निर्मितीसाठी 60 लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला असल्याने लवकरच पुलाच्या निर्मितीचे काम सुरु करण्यात येईल, अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.