परभणी - 'कोरोना'च्या लढाईत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे लढणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी देखील तितकीच महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी पोलीस मुख्यालयात 600 हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी संशयित पोलिसांवर औषधोउपचार करून 22 जणांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, तर काही जणांचे स्वॅब देखील तपासणीसाठी घेतले जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
पोलीस मुख्यालयात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आयएमए व पोलीस रुग्णालय यांच्या वतीने हे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 600 ते 700 पोलीस सहभागी झाले होते. विशेषतः या शिबिरात 'करोना' विषाणूशी निगडित तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये 367 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्या दृष्टीने तपासणी करण्यात आली. यातील जवळपास 22 जणांना शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. याशिवाय इतरांना औषधे वाटप करण्यात आले. यात प्रामुख्याने व्हीटामिन-सी, मल्टीव्हीटामिन, अझीथ्रोम्यासीन, पॅरासिटामॉल, अमोक्सलीन आदी आवश्यकतेनुसार औषधी देण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना विषाणूची लागण होऊ नये, यासाठी कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केल्याची माहिती डॉ. पी. डब्ल्यू. शिंदे यांनी दिली. या शिबिरात डॉ. कल्याण कदम, डॉ. मोरे सागर, डॉ. संदीप काला, डॉ. सोमानी, डॉ. राजू सुरवसे, डॉ. कल्पना सावंत, डॉ. कान्हे, डॉ. अग्रवाल, डॉ. काकडे, डॉ. राम पवार यांनी तपासणी केली. तर शिबिराच्या तयारीसाठी पोलीस अधिकारी शिंदे, संदीपान शेळके, प्रवीन मोरे, राठोड यांनी काम पाहिले.