परभणी - जिल्ह्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत झालेल्या अतिवृष्टीत जवळपास संपूर्ण जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत प्रशासनाने 468 गावात पंचनामे केले आहेत. ज्यामध्ये 3 लाख 38 हजार शेतकऱ्यांचे पंचनामे झाले असून, यामध्ये 3 लाख 26 हजार हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाने गोळा केली आहे.
हेही वाचा... येत्या महिनाभर बाजारात कांद्याचा भासणार तुटवडा ; पावसाने खराब मालाची आवक
परभणी जिल्ह्यात पावसाळ्यात पावसाने कमालीची दडी मारली होती; परंतु पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात परतीचा पावसाने परभणी जिल्ह्याला चांगलाच फटका दिला. मागील सुमारे पंधरा दिवस सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे एकट्या ऑक्टोबर महिन्यात तीनशे टक्के पावसाची नोंद झाली. शिवाय सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला. ज्यामुळे सोयाबीन, कापूस, तुर आदी पिकांची प्रचंड नुकसान झाले. यामुळे पंचनामे होऊन नुकसान भरपाईची मागणी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यानुसार महसूल विभाग, कृषी विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त पथकाने आत्तापर्यंत 468 गावांच्या शेतात भेटी देऊन 3 लाख 38 हजार 762 शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले. विशेष म्हणजे 843 गावात नुकसानीची नोंद झाली आहे. अजून निम्म्या गावांमध्ये पंचनामे होणे बाकी असून जिल्ह्यातील जवळपास बहुतांश भागात नुकसान झाले आहे.
हेही वाचा... ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात व्यापाऱ्यांचा संघर्ष; बुधवारपासून करणार देशभरात निदर्शने
जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 26 हजार 295 हेक्टरवरील पंचनामे करण्यात आले असून, यामध्ये 33 टक्क्यांहून अधिकच्या नुकसानीची नोंद आहे. परभणी तालुक्यातील 31 गावांमध्ये पंचनामे झाले असून सेलू 36, जिंतूर 111, पाथरी 49, मानवत 48, सोनपेठ 52, गंगाखेड 98, पालम 22 तर पूर्णा तालुक्यातील 35 गावांमध्ये पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका हा परभणी तालुक्यात पहावयास मिळत आहे. तब्बल 63 हजार 500 शेतकऱ्यांच्या 58 हजार 314 हेक्टरवरील पिकांना फटका बसला. जवळपास सर्वच तालुक्यांमधील शेतकऱ्यांचा तीस ते चाळीस हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा... भीम अॅप प्रथमच चालणार विदेशातही; सिंगापूर आणि फिक्कीत सामंजस्य करार
कृषी विभागाने यापुर्वी तीन लाखाहून अधिक हेक्टरवरील शेतातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल दिला होता; परंतु प्रत्यक्षात मात्र निम्म्या गावांच्या पंचनाम्यात सव्वा तीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अजून निम्म्या अधिक गावांमध्ये पंचनामे होत आहेत. त्याचा अहवाल येणार असून यामध्ये जवळपास प्रत्येकी दोन लाखाहून अधिक हेक्टरवरील सोयाबीन आणि कपाशीचे नुकसान पुढे येण्याची शक्यता आहे.