परभणी : जिल्ह्यातील 'कोरोना हॉटस्पॉट' ठरलेल्या गंगाखेड शहरात आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार गंगाखेड शहरात पुढील चार दिवस म्हणजेच रविवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बाजारपेठा आणि इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. या वाढीव संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज (बुधवारी) दुपारी काढले आहेत.
गंगाखेड शहरात 28 जूनरोजी एका बड्या जिनिंग उद्योजकाच्या लाडक्या मुलाचा पार पडलेला शाही विवाह स्वागत सोहळा गंगाखेडकरांसाठी चांगलाच डोकेदुखी ठरला आहे. या सोहळ्यानंतर गंगाखेडमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्याचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, त्यामुळे 200 हुन अधिक रुग्ण यामुळे बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, त्या पार्श्वभूमीवर यापूर्वी सलग 9 दिवसांची संचारबंदी लावण्यात आली होती. त्यानंतर मागच्या आठवड्यात रविवारी बाजारपेठ उघडली. मात्र, याचा गैरफायदा घेत गंगाखेडच्या बाजारात हजारो नागरिकांची झुंबड उडाली. त्यामुळे गंगाखेड मध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.
अनेकदा सूचना करून देखील लोक काळजी घेत नाहीत. कुठल्याही प्रकारच्या सोशल डिस्टन्सिंगचा पालन होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर परत 27 जुलैरोजी 2 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली. तरीदेखील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज आदेश बजावत ही संचारबंदी 31 जुलैपर्यंत म्हणजे दोन दिवसांसाठी वाढवली आहे. मात्र, जिल्ह्यात यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शनिवार-रविवार हे दोन दिवस नियमित संचारबंदी लागू असणार आहे. त्यामुळे 31 जुलैनंतर देखील पुढील 2 दिवस म्हणजेच 1 आणि 2 ऑगस्टरोजी अर्थात मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवेशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, या संचारबंदीत अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, औषधे आणि इतर काही सेवांना सूट देण्यात आली आहे. ज्यामध्ये विविध शासकीय कार्यालय, सेवाभावी संस्था आणि आरोग्य संदर्भातील सेवांना मात्र या संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे. तसेच सर्व शासकीय कार्यालय व त्यांची वाहने, शासकीय व खासगी दवाखाने, वैद्यकीय दुकान, वैद्यकीय कर्मचारी व आपत्कालीन सेवा, शासकीय निवारागृह व अन्न वाटप करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाना घेतलेली वाहने व व्यक्ती, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक्स मिडिया यांचे संपादक, प्रतिनिधी, वितरक, पेट्रोलपंप व गॅस वितरक, कर्मचारी व वाहने तर राष्ट्रीय बँका केवळ रास्तभाव दुकानदारांकडून चालनद्वारे रोकड़ भरणा तसेच ग्रामीण भागातील बँकेसाठी रोकड घेवून जाणारी वाहने व दूध विक्रेत्यांना सकाळी 6 ते 9 या वेळात संचारबंदीच्या काळात मुभा देण्यात आली आहे. याशिवाय कृषी दुकाने गोदामे आणि त्यासंदर्भातील वाहनांना देखील मुभा देण्यात आली असून, ई-महा सेवा केंद्रांना पीक विमा भरणा करून घेण्यासाठी दुकाने उघडी ठेवण्याची सवलत देण्यात आली आहे.