परभणी - पतीनेच मुलगी, ग्रामसेवक, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याच्या संगनमताने बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने पत्नीला मृत दाखवून तिच्या नावे असलेली जमीन हडपली. यासंदर्भात पाथरी पोलीस ठाण्यात ७८ वर्षीय वृद्ध महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुख्मिनी किशनराव तायनाक असे पिडीत महिलेचे नाव आहे. पतीने तिला १९८० साली घरातून हकलून दिल्याने ती एकटीच राहात आहे. पती किशन धोंडीबा तायनाक, मुलगी वृंदावनी सुभाष मगर, भागवत मुंजाजी फड, धोंडीराम माणिक जाधव, मछिंद्रनाथ जालिंदरनाथ बामने ५ जणांनी ती निरक्षर असल्याचा फायदा घेत तिला मृत दाखवले आणि आपसात संगनमत करत खोटी कागदपत्रे तयार केली. तसेच याबद्दल तोंड उघडल्यास जिवंत मारण्याची धमकीही तिला दिली होती.
या महिलेची किन्होळा खूर्द येथील गट क्रमांक ६६ मधील १ हेक्टर ६७ आर जमीन आहे. ही जमीन खरेदीखत दाखवून हडप करण्यात आली. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. यासंदर्भातील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आवेज मकसुद काजी करीत आहेत.