परभणी - अर्धा पावसाळा संपला तरी कोरड्याठाक राहिलेल्या पाथरी तालुक्यातील ढालेगावच्या बंधाऱ्यात अखेर जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी बुधवारी पोहचले. जायकवाडी धरण जवळपास ९२ टक्के भरल्यानंतर या धरणाचे दोन्ही कालवे, जलविद्यूत केंद्र आणि मुख्य सांडव्याव्दारे नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे तहानलेल्या मराठवाड्याला (दुष्काळवाड्याला) निश्चित दिलासा मिळण्याची आशा आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात सर्वत्र पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक, नगर भागातील लहान मोठी धरणे, बंधारे भरल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी जायकवाडी धरणात येत आहे. दरम्यान, मराठवाड्यात पाऊस नसल्याने मे महिण्यापासून ढालेगावचा बंधारा कोरडा पडला होता. ज्यामुळे पाथरी शहरासह काही ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यामुळे नदी पत्रात पाणी सोडण्याची मागणी होत होती. त्यातच उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस झाल्याने यावर्षी विक्रमी वेळेत पहिल्यांदाच जायकवाडीचा पाणी साठा ९२ टक्के झाला. त्यामुळे डाव्या कालव्यातून नऊशे ते चौदाशे क्यूसेसने आणि मुख्य सांडव्यातून जवळपास 4 हजार क्यूसेस प्रतीसेकंद पाण्याचा विसर्ग नदी पात्रात करण्यात येत आहे. हे पाणी ढालेगाव बंधाऱयात पोहचले आहे. या बंधाऱयात ३.४६ दलघनमी पाणी साठवणूक करून उर्वरीत पाणी नदी पात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती उप अभियंता खारकर यांनी दिली.
ढालेगाव बंधा-याची साठवण क्षमता १४.८७ दलघमी असून मृत साठा १.३७ दलघमी एवढा आहे. तर उपयुक्त पाणी साठा १३.५० दलघमी एवढा आहे. सद्यस्थितीत दुपारी बारापर्यंत वरील पाणी आवक ४६०० क्युसेस प्रती सेकंद आहे. या बंधाऱयातून नदी पात्रात अडीच हजार क्यूसेसने पाणी विसर्ग केला जात आहे. तर दोन हजार क्यूसेस पाणी साठवले जात असल्याचेही खारकर यांनी सांगितले. दरम्यान, यामुळे पाथरी शहरासह ग्रामीण भाग आणि गोदा काठावरील गावांमधील पाणी टंचाई दूर होणार आहे. या पाण्यामुळे गोदावरी काठावरील गावे आणि पाथरी शहराचा पाणी प्रश्न तुर्तास मिटला असला. तरीपण बी-५९ या वितरीकेला पाणी सोडल्यास अनेक गावांतील पाणी टंचाईचे संकट दुर होणार आहे. त्यामुळे तालुक्यात सर्वात जास्त दुष्काळाच्या झळा सोसणाऱया उत्तर भागातील गावांना या वितरीकेच्या पाण्याने दिलासा मिळून माणस आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे आता याकडे जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी लक्ष घालून सर्वाधिक दुष्काळाची झळ असलेल्या बाभळगाव मंडळातील गावांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.