परभणी - मागील महिन्यात ज्याप्रमाणे उन्हाच्या झळा शहरवासीयांनी सोसल्या त्याच तीव्रतेच्या झळा आता आठवडाभर सोसाव्या लागणार आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार परभणीत उद्या रविवार १९ मे) ते पुढच्या रविवारपर्यंत (२५ मे) आठवडाभर तापमानाचा पारा ४५ अंशाच्या पुढे राहणार आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडावे, आपली कामे सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी उरकून घ्यावीत आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात १९ मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे २५ मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. या दरम्यान अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान ४६ अंशापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४७ अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. विदर्भातल्या उर्वरित जिल्ह्यांसह धुळे, जळगाव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंशापर्यंत पोहचेल. उर्वरित मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान ४२ अंशाच्या आसपास राहील, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, मागच्या एप्रिल महिन्यात परभणीत उष्णतेचा पारा ४७ अंशावर पोहचला होता. त्यामुळे परभणीतील लोकांना उष्माघाताचा सामना करावा लागतो आहे. यात तीन जणांचा मृत्यू देखील झाला. आता पुन्हा एकदा उष्णतेची लाट येणार म्हटल्यावर परभणीकरांच्या जीवाची काहिली होत आहे. दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. रहदारीच्या भागात देखील तुरळक वाहतूक दिसून येत आहे.
आरोग्याची काळजी घ्या - डॉक्टरांचा सल्ला
वाढत्या तापमानापासून लोकांनी काळजी घ्यावी. योग्य प्रमाणात पाणी प्यावे, बाहेर पडताना पांढरे आणि सैल कपडे परिधान करावेत, सकाळी किंवा संध्याकाळी आपली कामे करावीत. विशेषतः लहान मुलांना जपण्याचा सल्ला येथील डॉ. संजय खिल्लारे यांनी दिला आहे. तसेच उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्यावर लगेच उपचार करावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.