परभणी - हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करणारा प्रकल्प परभणीत सुरू झाला आहे. जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतील कोविड रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज 280 जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. सध्या या इमारतीत पहिल्या मजल्यावर दाखल असलेल्या 50 रुग्णांना हे ऑक्सिजन देण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांनी दिली आहे.
प्रकल्पाचे वैशिष्ट्ये
या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पातून 96 टक्के शुद्ध ऑक्सिजन मिळणार आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प हवेतील कार्बनडाय ऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइड वेगळे करून शुद्ध ऑक्सिजन शोषून घेतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून 280 जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. 18 एप्रिल रोजी हा प्रकल्प परभणीसाठी मंजूर झाला होता. त्यानंतर या प्रकल्पाचे काम जलद गतीने करण्यात येऊन कार्यान्वित झाला आहे. या माध्यमातून दररोज शेकडो रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य होणार आहे.
...त्यानंतरच ऑक्सिजन वापरास परवानगी
पनवेलच्या प्रयोगशाळेतून तपासणी अहवाल आल्यानंतर या प्रकल्पातून निर्माण होणारे ऑक्सिजन रुग्णांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरणे योग्य आहे की नाही, याचा निर्णय प्रयोशाळेने 3 वेळा नमुन्यांची तपासणी करून दिला आहे. त्या तपासणीअंती प्रकल्पातून तयार होणाऱ्या ऑक्सिजनची शुद्धता 93.8 टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरण्यास परवानगी दिली.
आणखी एक प्रकल्प सुरू होणार -
परळी येथील औष्णिक विद्युत केंद्र येथून हा प्रकल्प प्राप्त झाला आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारे ऑक्सिजन सध्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर दाखल असलेल्या 50 रुग्णांना देण्यात येणार आहे. तसेच या नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरच्या रुग्णांना देखील याच ऑक्सिजनचा वापर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अजून एक असाच प्रकल्प परभणीच्या जिल्हा रुग्णालयात देखील सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर परभणीला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असा विश्वास उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी व्यक्त केला आहे. उद्घाटन कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा रुग्णालय आणि अन्न व औषधी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.