परभणी - वृद्ध, अपंग व गरीबांना टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचा आज पडेगाव येथे शुभारंभ करण्यात आला. महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. 'संकल्प स्वराज्य उभारणीचा' या समुहाचे प्रमुख शामसुंदर निरस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमास थेट अमेरिकेतून वर्षा पुराणीक यांचे अर्थसहाय्य मिळाले आहे.
समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांच्या हस्ते या सामाजीक उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी उपस्थितांनी संकल्प स्वराज्य उभारणी समुहाच्या या उपक्रमाचे कौतुक करत पाण्याचे महत्व पटवून दिले. भविष्यातील पाणी संकट टाळण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण आणि वृक्षारोपणाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पडेगाव येथील हनुमान मंदीरासमोर पार पडलेल्या या कार्यक्रमास गावातील जेष्ठ नागरिक, युवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
शुभारंभावेळी पाणी भरून नेण्यासाठी टँकरभोवती गर्दी झाली होती. यापुढे अपंग आणि जेष्ठ नागरिकांना घरपोच पाणी देण्यात येणार असल्याचे शामसुंदर निरस यांनी सांगीतले. संकल्प स्वराज्य उभारणी समुहाच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. या प्रसंगी उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, साईसेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव, प्रा. डॉ. संजीव कोळपे, प्रा. नितीन लोहट, प्रा. सुभाष ढगे, बाबु स्वामी, प्रा. विलास साखरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.