परभणी - जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर बंधाऱ्यात पोहताना दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज (सोमवार) पुन्हा जिंतूर तालुक्यातील वझर गावालगतच्या धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या चुलत भावांचा पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. श्रीओम ज्ञानेश्वर पजई (18) व महेश भानुदास पजई (16) अशी मृत्यू झालेल्या या दोन चुलत भावांची नावे आहेत.
जिंतूर तालुक्यातील वझर या गावच्या पजई कुटुंबातील श्रीओम व महेश हे दोन चुलत भाऊ सकाळी गावालगतच्या धरणाजवळील पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. बारावीत शिकणारा श्रीओम आणि अकरावीत शिक्षण घेत असलेला महेश हे दोघे पाण्यात उतरले होते, परंतु त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते पाण्यात बुडाले. ही बाब काही जणांच्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पाण्याबाहेर काढून लगेच त्यांना वझर येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु तेथे आरोग्य अधिकारीच नसल्याने त्यांना तातडीने खासगी वाहनाद्वारे जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात येत होते. या घटनेमुळे वझर गावावर शोककळा पसरली असून दुपारनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अशीच एक घटना शनिवारी (३० मे) घडली होती. पूर्णा तालुक्यातील निळा येथील 3 युवक दुपारी पोहण्यासाठी निळा-महागावच्या सीमेवरील कंठेश्वर कोल्हापूरी बंधाऱ्यावर गेले होते. कल्याण उमाजी सूर्यवंशी (15), ज्ञानेश्वर शिवाजी सूर्यवंशी (18) आणि शंकर निवृत्ती सूर्यवंशी अशी त्यांची नावे होती. यातील कल्याण सूर्यवंशी व ज्ञानेश्वर सूर्यवंशी या दोघांना पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाला. तर, शंकर सूर्यवंशी हा पटकन काठावर आल्याने तो बचावला. तर, या घटनेला एक दिवस उलटत नाही तोच जिंतूर तालुक्यात आणखी दोन चुलत भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.