परभणी - जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील एका गावच्या विद्यमान सरपंचाचा पतीच अट्टल चोर निघाला आहे. एका ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या २५ तोळे दागिन्यांसह दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास करणारा हा चोरटा परभणीसह कोल्हापूर आणि बीड पोलिसांना गुंगारा देत फिरत होता. परंतु, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पहाटेपासूनच गंगाखेड बसस्थानकात सापळा रचून त्याला मोठ्या शिताफीने अटक करून कोल्हापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
खुशाल सोमनाथ पवार (रा. कमलापुर ता. पुर्णा) असे या अट्टल चोराचे नाव आहे. लक्ष्मीपूर पोलीस ठाण्यात (जि.कोल्हापूर) दाखल गुन्ह्यात हा चोर पोलिसांना हवा होता. या प्रकरणातील फिर्यादी महिला काही महिन्यांपूर्वी शर्मा ट्रॅव्हल्सने लातूर ते कोल्हापूर, असा प्रवास करत असताना त्यांच्या बॅगमधील २५ तोळे सोने व १ लाख ४९ हजार रूपये असा ऐवज चोरीला गेला होता. हा गुन्हा खुशाल पवार यानेच केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मात्र, तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. परभणी जिल्ह्यात व इतर ठिकाणी कसून शोध घेतला. मात्र, तो काही कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी वॉन्टेड म्हणून त्याचे फोटोचे भित्तीपत्रके सुध्दा विविध ठिकाणी लावून नागरिकांत जनजागृती केली होती. विशेष म्हणजे खुशाल पवार याने बीड जिल्ह्यात जाऊन अनेक गुन्हे केले होते. त्यामुळे बीड पोलीससुध्दा त्याचा शोध घेत होते.
खुशाल पवार यांची पत्नी कमलापूर या गावाची विद्यमान सरपंच असल्याने त्याच्या बाबत स्थानिक कुठलीही माहिती देत नव्हते. म्हणून कोल्हापूर पोलिसांनी खुशाल पवार हा त्यांना गुन्ह्यात पाहिजे असून त्याला शोधून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे प्रविण मोरे यांनी आरोपींबाबत माहिती संकलीत करण्यास सुरुवात केली. त्यासाठी पथक तयार करण्यात आले. दरम्यान, ८ जूनला मिळालेल्या गोपनिय माहितीवरून एक पथक तात्काळ आरोपीच्या शोधकामी गंगाखेड येथे रवाना करण्यात आले. आरोपी हा आज गंगाखेड बसस्थानक परिसरात येत असल्याची माहिती मिळाल्याप्रमाणे पथकाने पहाटेपासूनच या परिसरात सापळा रचला होता.
या ठिकाणी पथकाच्या समयसुचकतेमुळे व शिताफीने केलेल्या कारवाईमुळे भक्कम शरीरयष्टी व अडमूठ स्वभावाचा खुशाल सोमनाथ पवार हा पथकाच्या हाती लागला. पथकाने त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचबरोबर खुशल्या पवार हा गुन्हेगारांना आश्रय देऊन त्यांच्याकडून गुन्हे घडवून आणण्याच्या सवयीचा आहे. आरोपीस लक्ष्मीपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकान्त उपाध्याय, अपर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनिल गोपिनवार, प्रकाश कापुरे, पोह सातपुते, राख, लक्ष्मीकांत धुतराज, सुरेश डोंगरे, किशोर चव्हाण, सयद मोबीन, सयद मोईन, संजय घुगे, मुलगीर, राजेश आगाशे, दिलावर पठाण, राम घुले यांनी मिळून केली आहे.