परभणी - मराठवाड्यातील औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये सर्वाधिक मतदान परभणी जिल्हात तब्बल 67.43 टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, आतापर्यंत 35 ते 40 टक्केच मतदान झालेल्या या मतदारसंघात यावेळी मात्र मतदारांनी भरघोस प्रतिसाद देऊन मतदानाची टक्केवारी वाढवली आहे.
परभणी जिल्ह्यातील 78 केंद्रांवर मंगळवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये एकूण मतदारांपैकी 22 हजार 62 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतपेट्या एकत्र करुन औरंगाबाद येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉग रुममध्ये पाठवण्यात आल्या आहेत. 3 डिसेंबरला मतमोजणी होवून निकाल जाहीर केला जाणार आहे.
22 हजार 62 मतदारांनी केले मतदान
परभणी जिल्ह्यात 6 हजार 770 महिला व 25 हजार 945 पुरुष असे एकूण 32 हजार 715 मतदार असून, यापैकी 22 हजार 62 मतदारांनी मतदान केले. यात 3 हजार 752 महिलांनी तर 18 हजार 310 पुरुष पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पदवीधर मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
'कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांची तपासणी'
सर्व मतदान केंद्रांवर अत्यावश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. सर्व केंद्र निर्जंतुक करण्यात आले होते. तसेच कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदार, अधिकारी, आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. या मतदान प्रक्रियेसाठी 30 क्षेत्रीय अधिकारी, 67 रुट गाईड, 380 मतदार अधिकारी आणि 12 आरोग्य नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.