परभणी - पाथरी शहर व तालुक्यातून सांगली व कोल्हापूरच्या पुरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणत मदत जमा झाली होती. या मदतीमधून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करत सहाशे कुटुंबांसाठी १० दिवस पुरेल एवढे पीठ, तेल, तांदूळ, साबण, तिखट, मीठ आणि अन्य सामुग्रीसह साडी, नविन ड्रेस, सतरंजी, भांडे, ब्लॅकेट आणि दोनशे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य घेऊन शुक्रवारी रात्री उशिरा ही मदत पाथरीतून २३ स्वयंसेवक विविध गाड्यांमधून रवाना झाले.
पश्चिम महाराष्ट्रात प्रारंभीच कृष्णा, पंचगंगा या नद्यांना पूर आल्याने सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यात अनेकांचे संसार उध्वस्त झाले. घरे पाण्याखाली गेल्याने जीवनावश्यक वस्तुंचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे पूरग्रस्त बांधवांना मदत म्हणून पाथरी शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागातून मदत जमा करण्यात आली. विशेषतः सर्वांना जीवनावश्यक वस्तू मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर पाथरीकरांनी या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद दिला.
पाथरी शहरातून मदत फेरी काढली. यात अनेकांनी मदतीचा हात दिला. तर ग्रामीण भागातून कासापुरी, रेणापूर, पाटोदा, किन्होळा, लोणी बुद्रूक, देवेगाव, खेडूळा, रामपुरी, रत्नेश्वर यासह अन्य गावांतून धान्य आणि नविन कपडे, साड्यांची मदत पुरग्रस्तांसाठी मिळाली. तसेच औषधांची मोठी मदत प्राप्त झाली. ही मदत शुक्रवारी रात्री रवाना करण्यात आली असून वाटपासाठी २३ स्वयंसेवक देखील सोबत गेले आहेत.