परभणी - शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. प्रचंड ढग दाटून आले असून, सुरुवातीला वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. त्यानंतर तुफान पाऊस सुरू झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. या दमदार पावसामुळे पेरण्यांची लगबग सुरू होणार आहे.
परभणी जिल्ह्याची पावसाची सरासरी सुमारे 778 मिलीमीटर एवढी आहे. गेल्या काही वर्षांत परभणी जिल्ह्यात सरासरीचा पाऊस पडत असल्याने पाणीटंचाई कमी होण्यास मदत झाली आहे. आज (सोमवारी) सायंकाळी 6 वाजता परभणीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाला प्रचंड वेगात आणि वादळी वाऱ्यासह सुरुवात झाली होती. त्यानंतर सुमारे पाऊणतास संततधार सुरू होती. त्यामुळे परभणी शहरातील बस स्थानकाच्या मैदानावर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. याशिवाय शहरातील गांधी पार्क, कच्छी बाजार, सुभाष रोड आदी बाजारपेठेच्या सखल भागात देखील रस्त्यांवर पाणी साचले होते. अनेक ठिकाणच्या नाल्याचे घाणपाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे कोरोनासारख्या महामारीत अन्य काही संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याची भीती नागरिक व्यक्त करत होते. त्यामुळे महापालिकेने नाल्यांची स्वच्छता चांगल्या पद्धतीने करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हा पाऊस परभणी तालुक्यासह जिंतूर, मानवत, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा, पालम, गंगाखेड आदी तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पडला. यामुळे आता खरिपाची पेरणी होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
पेरण्यांची लगबग सुरू होणार -
संपूर्ण जिल्ह्यात सकाळी ८ वाजेपर्यंत मोजण्यात आलेल्या पावसाची नोंद सरासरी 85 मिलिमीटर एवढी झाली आहे. साधारणपणे शंभर ते सव्वाशे मिलिमीटर पावसानंतर पेरण्यांना सुरुवात होते. त्यानुसार आज पडलेल्या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील पावसाची सरासरी शंभरी ओलांडण्याची चिन्हे आहेत. त्या अनुषंगाने बळीराजा खरिपाच्या पेरणीला सुरुवात करू शकेल. त्यानुसार उद्यापासून सर्वत्र पेरण्यांची लगबग दिसणार आहे.
जूनमध्ये झालेल्या पूर्वमोसमी पावसाची चर्चा -
यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच पूर्वमोसमी पावसाने परभणी जिल्ह्यात हजेरी लावली होती. त्यानंतर 11 जून रोजी मध्यरात्री झालेला मुसळधार पाऊस चर्चेचा विषय ठरला. त्या दिवशी पाऊस नेमका किती पडला? यावरून मोठा संभ्रम निर्माण झाला होता. अखिल भारतीय हवामान विभाग, महसूल यंत्रणा आणि परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान यंत्रणेकडे या पावसाची वेगवेगळी नोंद झाली होती. देशपातळीवरील हवामान विभागाने तर परभणीत एका दिवसात पडणाऱ्या पावसाने शंभर वर्षांपूर्वीचा रेकॉर्डब्रेक झाल्याचे म्हटले होते. तब्बल 186 मिलिमीटर पावसाची नोंद त्यांनी केली, तर महसूल यंत्रणेच्या पाऊस मोजमाप यंत्रावर हाच पाऊस सुमारे 85 मिलिमीटर एवढा नोंदवण्यात आला. याशिवाय कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने या पावसाची नोंद 58.८ मिलिमीटर एवढी केली. या प्रकाराचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी पाच सदस्य अधिकार यांची समिती स्थापन केली आहे.