परभणी - मराठी सिनेमांमध्ये एखादाच सैराटसारखा सिनेमा निर्माण होतो. मात्र, इतर मराठी सिनेमांसाठी अनेकवेळा चित्रपटगृह उपलब्ध नसते. या पार्श्वभूमीवर परभणीतील आधुनिक बसपोर्टसह महाराष्ट्रातील ग्रामीण भागात होणाऱ्या बसस्थानकांवर चित्रपटगृहांची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी येथे दिली. त्यामुळे 12 कोटी रुपयांचा हा प्रकल्प पंधरा कोटी रुपयांवर जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
येथील जुन्या झालेल्या बसस्थानकाच्या जागी नवीन बसपोर्ट उभारण्यात येत असून त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात आज दिवाकर रावते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार बाबाजानी दुर्राणी, महापौर मीना वरपूडकर, जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, आयुक्त रमेश पवार, डॉ. विवेक नावंदर, गंगाप्रसाद आनेराव, विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी, अनिल डहाळे, संभानाथ काळे, उद्धव मोहिते, बाबू फुलपगार आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आपण एसटी महामंडळामध्ये मराठी भाषेची सक्ती केली आहे. त्यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. इंग्रजीचा वापर झाल्यास कारवाईला तयार रहा, असा इशारा देतानाच रावते यांनी मराठीचा वापर सुरू करणाऱ्यांचे अभिनंदनही केले. दरम्यान, सध्या पाच ते सहा बसस्थानकांच्या नूतन इमारतींवर चित्रपटगृहांची निर्मिती होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या मुलांना 750 रुपये पॉकेटमनी देणार -
दरम्यान, संपूर्ण भारतात कुठेही नसलेली एक अभिनव योजना यावेळी दिवाकर रावते यांनी जाहीर केली. महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जी मुले कॉलेजात शिकतात, त्या सर्व मुलांना दर महिन्याला 750 रुपये पॉकेटमनी दिला जाणार आहे. विशेष म्हणजे हे पैसे त्या मुलांच्या थेट खात्यात टाकले जाणार आहेत. सुमारे 33 हजार मुला-मुलींना याचा लाभ मिळणार आहे.
....तर त्या कर्मचाऱ्यांना अधिकचे दहा लाख रुपये मिळणार -
एसटी महामंडळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक कर्मचाऱ्यांना 55 वर्षाच्या पुढे थकायला होते. अधिक मेहनतीमुळे ते काम करण्यास सक्षम राहत नाहीत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली तर त्यांना त्यांचा नियमित मिळणारा सर्व मोबदला देऊन त्यासोबत अधिक दहा लाख रुपये दिले जाणार आहेत, अशी महत्त्वाची घोषणा रावते यांनी यावेळी केली. तसेच हे कर्मचारी समाधानाने पुढील आयुष्य जगू शकतील आणि विशेष म्हणजे त्यांच्या जागी नवीन तरुणांना संधी मिळणार आहे, असेही रावते यांनी सांगितले.