परभणी - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने आणि सेवा जवळपास दोन महिन्यांपासून कमीअधिक प्रमाणात बंद आहेत. यामध्ये दारूची दुकाने तर पूर्णतः बंद होती. मात्र, आता दोन महिन्यांपासून मद्याच्या विरहात असणाऱ्या मद्य शौकिनांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना घरपोच दारू उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सकाळी 7 ते 11 या वेळेत मद्य विक्रेत्यांना ग्राहकास घरपोच दारूची विक्री करण्याची मुभा दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक सूचना
दरम्यान, या संदर्भात जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी काढलेल्या आदेशात 'दारू विक्रेत्यांना कुठल्याही परिस्थितीत दुकान उघडून ग्राहकांना मद्य विक्री करता येणार नाही, तर ग्राहकांना देखील कुठल्याही परिस्थितीत मद्याच्या दुकानाला भेट देता येणार नाही', असे निर्बंध लावले आहेत.
मद्याची दुकाने उघडली जाणार नाही
शासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्या संदर्भातील नियमावली देखील जाहीर केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील परवानाधारक मद्य विक्रेत्यांची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, दोन महिन्यांपासून ही दुकाने बंद असल्याने मोठ्या प्रमाणात दारूचा काळाबाजार होत होता. तसेच यापुढे 1 जूनपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असल्याने दारूची दुकाने उघडणार नाहीत. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने जिल्ह्यातील मद्य विक्री परवानाधारकांना सकाळी 7 ते 11 या वेळेत घरपोच मद्य विक्रीची परवानगी दिली आहे. तसेच देशी दारू विक्रेत्यांना सीलबंद बाटलीतून घरपोच मद्य विक्री करता येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मद्याची दुकाने उघडली जाणार नाही. तसेच मद्य विक्रेत्यांना दुकान उघडून पार्सल पद्धतीने दुकानातून ग्राहकांना मद्य विक्री करता येणार नाही. शिवाय कुठल्याही परिस्थितीत ग्राहकाने देखील मद्य विक्रीच्या दुकानाला भेट देऊ नये, असे निर्बंध या आदेशात लावण्यात आले आहेत.
'नियमांचे पालन न झाल्यास कारवाई'
दरम्यान, सर्व मद्य विक्रेत्यांना घरपोच मद्य विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मद्यविक्री करताना परवानाधारक दुकानदारांनी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांच्या पत्राचे पालन करावे, असे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या व्यतिरिक्त सर्व परवानाधारक दुकाने पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन स्तरावर तसेच स्थानिक प्रशासनाद्वारे देखील देण्यात आलेल्या सर्व निर्देश आणि सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे मद्य विक्रेत्यांना बजावण्यात आले आहेत. या नियमांचे पालन न झाल्यास कारवाई केली जाणार आहे, असे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
अंमलबजावणीची जबाबदारी 'राज्य उत्पादन शुल्क'वर
या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क प्रशासनावर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यापासून मद्याची दुकाने बंद असल्याने परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूचा काळाबाजार होत होता. अवैद्य दारू विक्रेत्यांना पकडण्यासाठी पोलिसांना मोठी मेहनत घ्यावी लागत होती. मात्र, आता घरपोच दारू उपलब्ध होणार असल्याने दारूचा काळाबाजार थांबण्याची शक्यता आहे व ग्राहकांनाही जादा पैसे देऊन दारू खरेदी करावी लागणार नाही.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ: मुंबईतील परिस्थितीचा ग्राउंड झिरो रिपोर्ट