परभणी - एका हातात खराटे, टोपले, पोते तर दुस-या हातात पाणी वाचवा, पाणी जिरवा, झाडे लावू, झाडे जगवू, मी कचरा करणार नाही, अंधश्रद्धा पाळू नका असा संदेश देत महिलांनी कचऱ्याची होळी साजरी केली. यावेळी महिलांनी जनजागृती फेरी काढत परिसरही स्वच्छ केला.
गेल्या 20 वर्षापासून जिजाऊ ब्रिगेड आणि पाणी वीज बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने शहरात अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येतो. यावेळी कांचन कारेगांवकर आणि सुनीता यादव यांनी पुढाकार घेत वसमत रस्ता परिसरातील एकता नगर, जागृती काॅलनी, भाग्यलक्ष्मी नगर या परिसरातील महीलांनी परिसर स्वच्छ केला. तसेच, स्नेहशारदा नगरात स्वच्छता फेरी काढली. मुली वाचवा, देश घडवा, पाणी वाचवा, झाडे लावा, झाडे वाढवा आदी फलक घेऊन घोषणा देत महिलांनी परिसर स्वच्छ केला. तसेच यावेळी पुरणपोळी न जाळता ती गरजूंना देण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. परिसरातील अनेक महीलांनी या उपक्रमाला प्रोत्साहन देत यात उत्स्फूर्तपणे सहभागही नोंदवला. या उपक्रमात जिजाऊ ब्रिगेडच्या उषा मोरे, मठपती, प्रणिता भोसले, प्रिया देशपांडे, उषा दुधाटे, अर्चना रणखांबे, सोनाली दुधाटे, संगीता सुरवसे इत्यादी महिलांनी पुढाकार घेतला. सोबतच पाणी वीज बचत गटाचे रणजित कारेगांवकर, प्रसाद ठाकुर, दीपक फाटे, बंडू मगर आदींनी महिलांना प्रोत्साहन दिले.