परभणी - जिल्ह्यातील गंगाखेड शहर व तालुक्यात सामान्यांसोबतच मोठे राजकीय नेते, अधिकारी, डॉक्टर्स आणि पोलीस देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित होताना दिसत आहेत. त्यात नगर पालिकेचे अध्यक्षच बाधित झाले असून अन्य काही लोकप्रतिनिधी व अधिकारी देखील कोरोनाग्रस्त झाले आहेत. तसेच गंगाखेड पोलीस ठाण्यातील 3 अधिकारी व 3 कर्मचारी बाधित आढळून आले आहेत. ज्यामुळे तहसीलदारांच्या आदेशाने पालिका आणि पोलीस ठाणे सील करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या सुरुवातीला परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहर आणि परिसर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. एका शाही विवाह सोहळ्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. मात्र, त्यानंतर प्रशासनाने कडक उपयोजना केल्याने याला थोडा ब्रेक बसला. ज्यामुळे कोरोना बाधितांची साखळी तुटली, असे वाटत होते. पण, पुन्हा या परिसरात कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. नगर परिषदेचे नगराध्यक्ष विजयकुमार तापडीया हेच कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली. त्यामुळे तहसीलदारांच्या सूचनेनुसार नगर परिषद कार्यालय सील करून कार्यालय दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा गंगाखेड पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. पोलीस ठाण्यातील दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक तर तीन पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने पोलीस ठाण्यात 'सील' करण्यात आले आहे. परिणामी गंगाखेड शहरातील नगर परिषद व पोलीस ठाणे हे दोन महत्त्वपूर्ण कार्यालय सील झाल्याने आरोग्य प्रशासनाची कोरोना विषयक चिंता पुन्हा नव्याने वाढली आहे.
दरम्यान, नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. त्यानंतर त्यांनी स्वतःची चाचणी करुन घेतल्यानंतर ते कोरोनाबाधित आढळले. यामुळे त्यांना स्थानिक आरोग्य प्रशासनाने होम क्वारंटाइन केले आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदारांच्या सूचनेनुसार नगर परिषद कार्यालय सील करण्यात आले. दोन दिवसांसाठी कार्यालय बंद करण्यात आल्याची सूचना देखील नगर परिषदेकडून जारी करण्यात येऊन कार्यालयासमोर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून फलक लावून परिसर सील करण्यात आला आहे.
या प्रमाणेच पोलीस ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे पोलीस ठाण्यातही खळबळ माजली असून, खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस ठाण्याचे मुख्य प्रवेशद्वार प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्यात आले आहे. पोलीस ठाण्याचा कारभार पोलीस अंमलदार आवारात खुर्ची टाकून अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सांभाळत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष व पोलीस ठाण्यातील अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींना रॅपिड अँटिजेन टेस्ट तातडीने करून घेण्याचा आरोग्य प्रशासनाने सूचना केल्या आहेत. परिणामी आगामी काळात कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामुळे आरोग्य प्रशासनापुढे पुन्हा एकदा डोळ्यात अंजन घालून काम करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. मागील महिनाभरात शहरात रॅपिड अँटीजेन टेस्ट झाल्या नाहीत. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
हेही वाचा - अवैध सावकारी प्रकरणी जिल्हा निबंधकांच्या पथकाचे दोन ठिकाणी छापे