परभणी - पोट भरण्यासाठी किरकोळ व्यवसाय करत विविध राज्यातून परभणीत आलेली ४० कुटुंबे सध्या शहराबाहेर पाल टाकून राहत आहेत. या बेघर कुटुंबांना भाजपच्या वतीने २० दिवस पुरेल एवढे अन्नधान्य शनिवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या परप्रांतीय आणि हातावर पोट असलेल्यांचा रोजगार बंद झाला आहे. त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचवण्यात आली.
![जिल्ह्यातील पालात राहणाऱ्या ४० परप्रांतीय कुटुंबांना २० दिवसांचे अन्नधान्य वाटप](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pbn-distribution-food-homeless-families-7203748_28032020175757_2803f_1585398477_406.jpg)
शहरातील वसमत रोडवरील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानात गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आदी राज्यांतून आलेले तसेच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातून कामासाठी आलेली ४० कुटुंबे पाल टाकून राहत आहेत. त्यांना भाजपने सुरू केलेल्या 'कम्युनिटी किचन' या अभियानाअंतर्गत धान्यवाटप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरू आहे.
जिल्ह्याचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या वतीने या ४० कुटुंबांना पुढचे २० दिवस पुरेल, अशी धान्याची रसद पुरविण्यात आली. यामध्ये गहू, तांदूळ, तेल, मसाला, साबण आदी साहित्याचा समावेश आहे. याचे वाटप जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या हस्ते केले.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशव्यापी 'लॉकडाऊन' चालू आहे. राज्य सरकार, जिल्हा प्रशासन लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करत आहे. मात्र, लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका कामगार, मजूर आणि गोरगरीब वर्गाला बसत आहे. त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपतर्फे 'कम्युनिटी किचन'चे जाळे उभारण्यात येत आहे.
शहरातील बेघर, धान्याची टंचाई असलेल्यांना याअंतर्गत भाजप महानगरतर्फे धान्य पुरवले जाणार आहे. या गरजूंनी भाजप मनपा गटनेत्या मंगल मुदगलकर, मोकिंद खिल्लारे, भीमराव वायवळ, सुनील देशमुख, सुहास डहाळे, विजय दराडे यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन भरोसे यांनी केले आहे.