परभणी- शिवसेनेच्या 'प्रथम ती' या महिलांसाठीच्या महत्त्वकांक्षी मोहिमेचा आज (सोमवार) परभणीतून शुभारंभ करण्यात आला. या संदर्भात राज्याच्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी परभणीतील बचत गटांच्या महामेळाव्यात ही घोषणा केली आहे. तसेच ही मोहीम परभणीतून सुरू होत असल्याने या ठिकाणच्या महिला भाग्यशाली असल्याचेही ठाकरे यावेळी म्हटल्या.
येथील शिवसेनेचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी परभणी जिल्ह्यातील बचत गटाअंतर्गत काम करणाऱ्या महिलांसाठी आज (सोमवारी) परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर महामेळावा घेतला. याच मेळाव्यात शिवसेनेने 'प्रथम ती' संमेलन घेऊन महिलांसाठीच्या या नवीन मोहिमेचा शुभारंभ देखील केला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित राज्याच्या महिला आर्थिक विकास मंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास आमदार डॉ.राहुल पाटील, शिवसेनेच्या महिला संपर्कनेत्या शिल्पा सरपोतदार, संप्रिया पाटील, महिला संघटक सखुबाई लटपटे, अंबिका डहाळे, डॉ. विवेक नावंदर, गंगाप्रसाद आनेराव, तसेच महिला बचत गटाच्या यशस्वी उद्योजिका आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रथम आपल्या प्रास्ताविकात आमदार पाटील यांनी परभणी जिल्ह्यात महिला बचत गटांसाठी गेल्या साडेतीन वर्षात केलेल्या कामांची यादीच वाचून दाखवली. ते म्हणाले, येथील महिला बचत गटांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. शिवाय महिलांसाठी राष्ट्रीयकृत बँकेपेक्षाही कमी व्याज दराने कर्ज देणारी पतसंस्था शिवसेनेच्या माध्यमातून उभी करण्यात आली आहे. याप्रमाणेच राज्यातील पहिली महिला सूतगिरणी परभणीत उभी राहत आहे. यानंतर शिल्पा सरपोतदार यांनी मार्गदर्शन केले. तसेच अंबिका डहाळे यांचेही भाषण झाले.
हेही वाचा- 'आमदार आपल्या दारी' उपक्रमाचा साडेपाच हजार ऑटो रिक्षाधारकांना लाभ, सरकारी योजनांवरही मार्गदर्शन
पुढे बोलताना ज्योती ठाकरे म्हणाल्या, महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही नुकत्याच झालेल्या सांगली, कोल्हापूरच्या महापुरातील लोकांना मदतीसाठी महिलांना आवाहन केले होते. त्यानुसार राज्यातल्या प्रत्येक बचत गटाच्या महिलेने केवळ एक रुपया गोळा केला आणि ही रक्कम थोडी नाही तर 14 लाख 21 हजार 228 रुपये गोळा झाली. हा निधी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. याशिवाय महिलांनी नऊ टनांचे दोन ट्रक भरून तांदूळ, डाळी, साखर, मसाला आणि इतर घरगुती साहित्य पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून पाठवले आहे. एवढे मोठे काम महिला बचत गटाच्या माध्यमातून होत आहे. यापूर्वी महिला आपल्या वस्तू विकण्यासाठी गल्लोगल्ली आणि दारोदारी फिरून विकत होत्या. मात्र आम्ही हे त्यांचे काम कमी केले आहे. महिलांच्या उत्पादनाला आता आम्ही थेट अॅमेझॉनचे दालन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे दररोज सकाळी उठलेल्या महिला मोबाईलवर आपल्या उत्पादनाची माहिती घेतात. आमच्या महिला बचत गटाच्या तुपाला अॅमेझॉन वर फाइव्हस्टार रँकिंग मिळत आहे. बचत गटाच्या उत्पादनाला आता प्रतिष्ठा मिळाली असून, त्यांचे उत्पादन चांगल्या पद्धतीने विकल्या जात आहे.
या कार्यक्रमात विविध महिला बचत गटांच्या उत्पादनांचे विक्री प्रदर्शन भरविण्यात आले होते. घरगुती लोणचे, पापड, कपडे, विविध वस्तुंसोबतच कृषी साहित्याचे देखील प्रदर्शन याठिकाणी भरले असून त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.
हेही वाचा- सत्ता कोणाचीही आली तरी सरकार आमचेच - सुप्रिया सुळे