परभणी - गंगाखेड तालुक्यातील डोंगरगाव (शे) शिवारातील डोंगरांवर आज (सोमवारी) आगीचा वणवा पेटला. दुपारी अचानक लागलेल्या या आगीच्या भक्ष्यस्थानी हजारो झाडे सापडण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान, या संदर्भात धनगर समाजाचे नेते सखाराम बोबडे पडेगावकर यांनी उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील यांना ही माहिती दिल्यानंतर सदर आग विझवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. तत्पुर्वी, परिसरातील तरुणांनी सदर आग विझवण्यासाठी पुढाकार घेतल्याने प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी येईपर्यंत, ही आग मोठ्या प्रमाणात आटोक्यात आली होती.
डोंगरगाव शिवारात गायरान जमिनीवरील डोंगरास आग लागल्याची घटना घडताच परिसरातील गावांमध्ये राहणाऱ्या तरुणांनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
हेही वाचा - संजय राऊतांचे घुमजाव; पवार-शाह गुप्त भेट झालीच नसल्याची दिली प्रतिक्रिया
'जमीन कोणाची यावरून 2 विभागात समन्वयाचा अभाव -
दरम्यान, सर्वप्रथम हा प्रकार सतीश गवळी या तरूणाला कळाला होता. त्यानंतर गावातील युवक दत्ता रुपनर, कृष्णा सोपान सोन्नर, हनुमान सोन्नर, माऊली वैजनाथ कांबळे, टोम्पे पंडित, शिवराम भालेराव व समाधान आदींनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले. पण ही आग आटोक्यात येत नसल्याचे कळताच गवळी यांनी सखाराम बोबडे पडेडगावकर यांना कळवली. बोबडे यांनी वनविभागाचे अधिकारी कामाजी पवार ,सार्वजनिक वनीकरण विभागीय अधिकारी वाकचौरे, उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील आदींना या आगीची माहिती कळवत आग वीझवण्यासाठी प्रशासन व यंत्रणा पाठवावी, अशी विनंती केली. मात्र, या दरम्यान वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग या दोन विभागात ही जमीन कोणाची यावरून समन्वयाचा अभाव दिसून आला.
चार्याचा प्रश्न निर्माण होणार,; दुर्मिळ वनौषधीची झाडेही आगीत भस्मस्थानी -
विशेष म्हणजे दोन-चार गावच्या सीमेवर असलेल्या या डोंगरावर भागातील हजारो जनावरे चरण्यासाठी जातात. या आगीमुळे चार्याचा प्रश्न निर्माण होणार असून, दुर्मिळ वनौषधीची झाडेही या आगीत भस्मसात झाली आहेत. अगोदरच चारा टंचाई असल्याने या भागातील शेळ्यामेंढ्या चारणाऱ्या मेंढपालांसमोर चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
'आग विझवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या युवकांना पुरस्कार द्या- बोबडे
दरम्यान, एकीकडे संपूर्ण देश होळीचा आनंद साजरा करत असताना आपल्या शिवारात लागलेली आग विझवणे, हे आपले कर्तव्य समजून सकाळपासून ही आग विझवण्यासाठी गावातील युवक धडपडत होते. त्यामुळे ही आग विझविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या युवकांना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहित करावे, अशी मागणी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केली आहे.
हेही वाचा - 'पंतप्रधानांना बांग्लादेशात कोणत्या जेलमध्ये ठेवले होते?'