परभणी - परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघांमध्ये प्रत्येक पक्षाला संधी मिळाली आहे. परभणी विधानसभा मतदारसंघात विद्यमान शिवसेनेचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी सर्वच विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करत मोठा विजय मिळवला. तर रासपच्या रत्नाकर गुट्टे यांनी कारागृहातून गंगाखेडची लढाई जिंकली आहे. तसेच पाथरीत मागच्यावेळी निसटता पराभव स्वीकारणाऱ्या काँग्रेसच्या सुरेश वरपूडकरांनी यंदा मात्र बाजी मारली. जिंतूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार विजय भांबळे यांना धूळ चारत भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी विधानसभा गाठली आहे.
- परभणीत आमदार राहुल पाटलांना 80 हजारांचे मताधिक्य
दरम्यान, परभणी मतदार संघात सेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी 'एमआयएम' चे आली खान यांच्यावर तब्बल 80 हजार 803 मतांची आघाडी घेऊन मोठा विजय मिळवला. खान यांना 22 हजार 666 मते मिळाली असून, तिसऱ्या क्रमांकावरील वंचित बहुजन आघाडीचे मोहम्मद गौस यांना 22 हजार 620 तर काँग्रेसचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांनी 18 हजार 260 मते मिळवली. तर प्रमुख उमेदवारांमध्ये शेवटच्या स्थानी राहिलेले काँग्रेसचे रविराज देशमुख यांना मात्र केवळ 15 हजार 441 मते मिळाली आहेत. एकूणच परभणीत जनतेने गेल्या तीस वर्षांपासून असलेला आपला शिवसेनेवरील विश्वास कायम ठेवत डॉ.राहुल पाटील यांना निवडून दिले आहे.
- जिंतूरात मेघना बोर्डीकरांचा भांबळेंवर 'विजय'
जिंतूर विधानसभा मतदार संघात प्रचंड अटीतटीची लढत होऊन शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विजय भांबळे यांच्यावर आघाडी मिळवून विजय संपादन केला. मेघना बोर्डीकर यांना 1 लाख 16 हजार 146 मते मिळाली असून विजय भांबळे यांना 1 लाख 12 हजार 579 मते मिळाली आहेत. बोर्डीकर या 3 हजार 567 मतांनी विजयी झाल्या. तसेच या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे मनोहर वाकळे यांना 13 हजार 107 तर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राम खराबे यांना केवळ 4 हजार 717 मते मिळाली आहेत.
- ...अखेर पाथरीत सुरेश वरपुडकरांनी बाजी मारली
पूर्वीच्या सिंगणापूर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना मागच्या (2014) निवडणुकीत आताच्या पाथरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे मोहन फड यांच्याकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी मात्र, जोरदार यंत्रणा राबवून सुरेश वरपुडकर यांनी मोहन फड यांच्यावर 14 हजार 774 मतांनी विजय मिळवला आहे. सुरेश वरपुडकर यांना 1 लाख 5 हजार 625 मते मिळाली, तर मोहन फड यांना 90 हजार 851 मतांवर समाधान मानावे लागले. या शिवाय वंचित बहुजन आघाडीचे विलास बाबर यांनी 21 हजार 744 तर शिवसेनेचे बंडखोर डॉ.जगदीश शिंदे यांना 1 हजार 551 मते मिळवता आली.
- रत्नाकर गुट्टे यांनी कारागृहातुन 'गंगाखेड' चा किल्ला जिंकला
पैसेवाल्या उमेदवारांचा मतदारसंघ म्हणून गेल्या पंधरा वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात यावेळी देखील पैशांचा महापूर वाहीला. विशेष म्हणजे कारागृहात राहून सुद्धा उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी या ठिकाणी बाजी मारली. गुट्टे यांना 80 हजार 519 मते मिळाली असून मुख्य विरोधक शिवसेनेचे विशाल कदम यांना 62 हजार 425 मतांवर समाधान मानावे लागले. गुट्टे यांनी 18 हजार 94 मतांनी विजय संपादन केला. तर तुल्यबळ समजल्या जाणाऱ्या माजी आमदार सीताराम घनदाट यांना 52 हजार 019 मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीच्या करूणा कुंडगीर यांनी 28 हजार 640 मते मिळवली. या शिवाय शिवसेनेतून नाराज होऊन बाहेर पडलेले अपक्ष संतोष मुरकुटे यांनी 22 हजार 860 मध्ये मिळवली. सर्वात लाजिरवाणी बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ.मधुसूदन केंद्रे यांना केवळ 8 हजार 144 मते मिळवता आली.
परभणीतील चार विधानसभा मतदासंघाचे निकाल
- परभणीत सेनेच्या आमदार पाटलांचा मोठा विजय
- रासपच्या गुट्टेनी कारागृहातून 'गंगाखेड' जिंकले
- पाथरीत काँग्रेसच्या वरपूडकरांनी बाजी मारली
- जिंतूरात भाजपच्या मेघना बोर्डीकर यांचा विजय