परभणी - जिल्ह्यात सरासरीच्या अक्षरशः ५० टक्के पाऊस झाला आहे. परिणामी असंख्य शेतकऱ्यांनी अद्यापही पेरण्या केलेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, यासह इतर मागण्यासाठी पुर्णा तालुक्यातील पांगारा ढोणे येथील शेतकऱ्यांनी शेतातील माळ्यावर (लाकडी मचाण) बेमुदत उपोषण सुरू केले आहे. असे अनोखे उपोषण करून हे शेतकरी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत.
दुष्काळाचे चटके सहन करत असलेल्या परभणी जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. निसर्गाचा लहरीपणा, पाण्याचे संकट आणि जनावरासह शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पांगरा ढोणे येथील शेतकरी तुकाराम ढोणे यांच्यासह गावातील अनेक शेतकऱ्यांनी या अनोख्या उपोषणाला आज शनिवारपासून सुरुवात केली आहे.
दरम्यान, तुकाराम ढोणे यांनी कर्जमाफी, दुष्काळ या विषयावर यापूर्वीसुद्धा आंदोलने केली आहेत. त्यांनी आपल्या कोरड्या विहरीत, नदीपात्रात व सरणावर बसून असेच अनोखे उपोषण केले होते. आता लाकडी मचाणावर या शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले असून शासन याची कशी दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.