परभणी - गतवर्षीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करावे या मुख्यमागणीसह इतर मागण्यांसाठी पाथरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर शेतकऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या वेळी शेतकऱ्यांनी बँकेच्या धोरणा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पाथरी तालुक्यातील गौंडगाव, उमरा, वाघाळा, पिंपळगाव येथील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार २०१८-१९ या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना पुनर्गठण करून कर्ज देण्यात यावे. तसेच याच वर्षात तालुक्यात शासनाने गंभीर दुष्काळ जाहीर केलेला आहे. त्यामुळे नियमानुसार पुनर्गठन करून देणे गरजेचे आहे.
तालुक्यात मागील चार वर्षापासून सतत दुष्काळ असून या वर्षीही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली आहे. दुष्काळी भागासाठी शासनाने ज्या १६ योजना लागू केल्या आहेत, त्या २०१८-१९ वर्षामध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱयांना लागु कराव्यात, अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यावेळी पुनर्गठन प्रकरणी बँकेच्या धोरणा विरोधात शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. जोपर्यंत बँक पुनर्गठन करून देत नाही, तोपर्यंत बँके समोरून उठणार नसल्याची भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे.
या वेळी कॉ. राजन क्षिरसागर, कॉ. विजय कोल्हे यांच्यासह लक्ष्मण कांबळे, सखाराम कांबळे, नारायण जामकर, बाबू कोल्हे, इंदूबाई कोल्हे, भास्कर हारकाळ, श्रीकिशन पानजंजाळ, पांडुरंग कोल्हे, मंगल कोल्हे, कालिदास कोल्हे, गणेश कोल्हे यांच्यासह शेकडो शेतकरी उपोषणास बसले आहेत.