परभणी - यावर्षी वेळेवर पाऊस पडला त्यामुळे खरीपाच्या पेरण्याही वेळेत झाल्या. मात्र, अनेक ठिकाणी पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. अशाच एका धास्तावलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथे घडली. या प्रकरणी आज पाथरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
विष्णू उद्धवराव शिंदे (वय - 42) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी शुक्रवारी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. विष्णू शिंदे यांना गतवर्षी शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसानीला तोंड द्यावे लागले होते. यंदाही त्यांनी शेतात सोयाबीनची पेरणी केली. पैसे नसल्याने उसनवारी करून त्यांनी बियाणे घेतले, शेजाऱ्याची बैलजोडी मागून पेरणी उरकली. मात्र, पेरलेल्या सोयाबीनची उगवण झालीच नाही.
मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शिंदे धास्तावले होते. कृषी विभागाने दोनच दिवसांपूर्वी न उगवलेल्या सोयाबीनचा पंचनामाही केला होता. मात्र, नव्याने पेरणी करण्यासाठी पैसे कुठून आणायचे या चिंतेने त्यांना ग्रासले होते. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी न पोहचल्याने घरच्या मंडळींनी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावर प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबियांनी शेजारच्या शेतकऱ्याच्या मोबाईल संपर्क साधला. शेजाऱयांनी शेतात जाऊन पाहिले असता विष्णु शिंदे यांचा मृतदेह लिंबाच्या झाडाला लटकत असल्याचे दिसून आले.
विष्णु शिंदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी आज त्यांचे भाऊ दत्ता शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तत्पूर्वी, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.